पणजी: पुढारी वृत्तसेवा
खोर्ली, म्हापसा येथील एका न भाड्याच्या बंगल्यात चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरवर सायबर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि ७ व्यक्तींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत २१ लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेले संशयित महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे लक्ष्मंद्र कौशिक (रा. ठाणे), सौरभ विकास घोडके (रा. रायगड, महाराष्ट्र), प्रवेश नामदेव सावंत (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), निसर्ग चेतनकुमार ठक्कर (रा. अहमदाबाद शहर, गुजरात), राजस रमेश भगत (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), अविनाश प्रदीप वर्मा (रा. शामली, उत्तर प्रदेश), हर्ष दिलीप बारुत (रा. अहमदाबाद, गुजरात अशी आहेत. हे संशयित पे डे या नावाने एका कर्ज देणाऱ्या कंपनीचे एजंट असल्याचे भासवत होते.
कर्ज आणि त्वरित रोख रक्कम देण्याचे खोटे आमिष दाखवून अमेरिकेतील निष्पाप नागरिकांना गिफ्ट कार्ड्सच्या स्वरूपात मोठी रक्कम भरण्यास भाग पाडून ते त्यांची फसवणूक करत असल्याची तक्रार आली होती. हा छापा सायबर गुन्हे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शेरविन डिकॉस्टा व मंदार गावकर, हवालदार योगेश खांडेपारकर व यदेश गौडे, पोलिस कॉन्स्टेबल इब्राहिम करोल व मयूर राणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा चारी व मिनिका यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या देखरेखीखाली टाकला. अटक करण्यात आलेल्या संशयितांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक मंदार गावकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.