पणजी : पुढारी वृत्तसेवा
दाबोळी येथील हॉटेल नॉव्हिल एक्झॉटिका समोरील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या बेकायदेशीर साठवणूक व पुरवठ्यावर क्राईम ब्रँच पोलिस पथकाने छापा टाकून सुमारे १.५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा इंधन टँकर, एक टिपर ट्रक आणि मोठ्या प्रमाणात संशयित पेट्रोलियम पदार्थ जप्त करण्यात आले.
क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक जिवबा दळवी यांना या बेकायदेशीर साठवणुकीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सुमारे सहा तास छापा टाकून कारवाई केली.
टँकरमधील ज्वलनशील द्रवाचे नमुने गोळा करून ते सीलबंद करण्यात आले असून न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत हा साठा आणि वाहने देवेंद्र नाईक ऊर्फ राजू चव्हाण, सांकवाळ-गोवा याच्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हे पेट्रोलियम पदार्थ काळ्या बाजारात विक्रीसाठी वळवले जात असल्याचा तसेच या बेकायदेशीर साठवणुकीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८७, पेट्रोलियम कायदा, १९३४ चे कलम २३, अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ३ व ७, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम ८ व १५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.