पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपविरोधात गोमंतकीयांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत 'गोवा राखण यात्रा' काढण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. दक्षिण गोवा व कुशावती जिल्हा तसेच ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करत गोवा आणि गोवेकरांविरुद्ध घेतलेल्या निर्णयांचा निषेध केला.
आलेमाव यांनी 'काँग्रेसचो मांड' या नव्या उपक्रमाचीही घोषणा केली. व्यासपीठाद्वारे प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते, नेते, या हितचिंतक व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन विविध प्रश्नांवर चर्चा करतील. जनतेच्या अपेक्षा, समस्या आणि सूचना जाणून घेऊन त्यांचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या भाजप सरकार जनतेवर नको असलेले प्रकल्प लादत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच ३९ए कलम रद्द करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. बैठकीला कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार एल्टन डिकॉस्टा, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष अझीझ नरोन्हा, कुशावती अध्यक्ष राजेश वेरेकर आदी उपस्थित होते.
नेतृत्व बदलाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना पदावरून हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने झालेल्या उपस्थितीचे श्रेय पाटकर यांच्या तळागाळातील कामाला दिले आणि जिल्हा व तालुका युनिटस्शी सल्लामसलत न करता काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याच्या हायकमांडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.