कोलवाळ कारागृहात एका कैद्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  Pudhari Photo
गोवा

Colvale Central Jail | कोलवाळ कारागृहात टारझन टोळीची गुंडगिरी सुरूच; खंडणीसाठी नव्या कैद्याला तुरुंगात बेदम मारहाण

Colvale Central Jail | कोलवाळ कारागृहात टारझन टोळीची दादागिरी सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा कोलवाळ

येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील हाणामारी सुरूच असून, हे प्रकार आता तुरुंग अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. कारागृहात टारझन पार्सेकर या कैद्याच्या टोळीकडून नव्या कैद्यांकडून खंडणीवसुली केली जात आहे. त्यामुळे हे कारागृह आता सुधारगृह राहिले नसून गुंडगृह बनले आहे.

कोलवाळ कारागृहात ब्लॉक क्रमांक ४ मध्ये पुन्हा हिंसक हाणामारीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अट्टल गुन्हेगार टारझन पार्सेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा सहभाग असून, अधिकारी त्याकडे बेदखल करत असल्याने इतर कैद्यांना जीव मुठीत घेऊन कारागृहात राहावे लागत आहे.

कारागृहात हाणामारी होत असताना तुरुंग रक्षकांमध्ये त्याला अटकाव करण्याची हिंमत नाही. तेथे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अधूनमधून बंद असल्याने या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचे चांगलेच फावले आहे. पार्सेकरच्या गटाबरोबर कैदी राकेश पाटील याच्याशी वाद झाला.

या भांडणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी तुरुंगात खंडणीसंबंधित वादातून हा संघर्ष झाल्याची चर्चा आहे. टारझनची टोळी कच्च्या कैद्यांकडून पैशांची मागणी करतात व त्याला नकार दिल्यास त्यांना बेदम मारहाण करून भीतीचे वातावरण तयार करतात. टारझनच्या टोळीतील एका कैद्याने केलेल्या या मारहाणीत राकेश पाटील याच्या नाकाला व डोक्याला दुखापत झाली.

त्याला तातडीने म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रकरणाची वाच्यता तुरुंग अधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही. असे अनेक प्रकार दडपले जात असल्याची माहिती सूत्राने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT