पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय संचालनालयाने किनारी गस्त मजबूत करण्यासाठी आणि किनाऱ्याजवळ होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छीमारांच्या होड्या तासाच्या दराने भाड्याने घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या होड्या उत्तर गोव्यातील हरमल व कळंगुट, तर दक्षिण गोव्यातील बाणावली, बायना आणि तळपण येथील किनाऱ्यावर तैनात केल्या जातील.
होड्यांवर १० एचपी क्षमतेची मोटर असावी आणि तिची लांबी ३० ते ३८ फूट दरम्यान असणे आवश्यक आहे. त्या होडीवर चालकासह किमान दोन कर्मचारी असणे आवश्यक आहे. जीवरक्षक उपकरणे (लाइफजॅकेट आणि लाइफबॉय), अग्निशमन उपकरणे आणि इतर लागू सुरक्षा साधनांनी सुसज्ज होडी असावी.
त्या होड्या चांगल्या स्थितीत असाव्यात आणि त्यात पुरेसे इंधनही असावे. तसेच मत्स्यव्यवसाय संचालनालयाच्या मागणीनुसार होडी उपलब्ध करून दिली जावी, होड्यांवरील सर्व कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
होडीसमवेत व्हेसल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (व्हीआरसी) आणि मच्छिमार परवाना असावा, ठरवलेला दर निविदा उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी आणि प्रति तास आधारावर वैध असणार आहे, निविदेत होडी भाड्याने घेणे, पेट्रोल, कर्मचारी आणि इतर लागू करांसह सर्व शुल्कांचा दर समाविष्ट असावा.
होड्या प्रत्यक्षात वापरल्याच्या दिवसांची आणि वेळेची संख्या पणजी येथील मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर आधारित असेल, असे खात्याने नियम व अटींमध्ये नमूद केले आहे. इच्छुकांनी आपली निविदा १६ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी
मत्स्यव्यवसाय संचालनालय, प्रधान कार्यालय, पणजी येथे सादर करावेत, असे सूचित केले आहे. संचालनालयाच्या किनारी भागातील सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मच्छीमार बोट भरकटली होती. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सरकारने मच्छीमार खात्याने पावले उचलली आहेत.