डिचोली : पुढारी वृत्तसेवा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून सामान्य नागरिकांच्या असासामान्य कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, नवोपक्रम स्वीकारावा आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथील रवींद्र भवन येथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, साखळी आणि रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मन की बात टू विकसित भारत-नॉलेज अँड इनोव्हेशनद्वारे स्वयंपूर्ण गोवा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये. जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि नावीन्यपूर्ण विचार आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा.
'मन की बात' या कार्यक्रमातील प्रत्येक भाग हा राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या सामान्य भारतीयांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देतो. विद्यार्थी, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी, कलाकार, संशोधक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांच्या समर्पित कार्यामुळेच विकसित भारताचे स्वप्न साकार होत आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, रवींद्र भवनचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञान, दृढनिश्चय आणि समाजसेवेची भावना या तीन मूल्यांच्या आधारे प्रत्येक विद्यार्थी विकसित गोवा आणि विकसित भारत घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
"युवकांनी स्टार्टअप गोवा, स्वयंपूर्ण गोवा, कौशल्य विकास अभियान आणि भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या नवोपक्रम परिसंस्थेचा लाभ घेऊन रोजगार निर्माते बनावे."— डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री