मागे राजकारणातील अळंबी गाजत होती. कुडचड्यात नीलेश काब्राल यांनी या अळंब्यांना वाचा फोडली होती. निवडणूक आली की अनेक नेते मतदारसंघात तयार होतात असे ते म्हणाले होते. त्यानंतर तसेच विधान पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले होते. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी गुज म्हणजेच पत्रकार संघटनेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अळंबी पत्रकारांचा उल्लेख केला. निवडणूक जवळ आली की अनेक पत्रकार तयार होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोबाईल घेऊन फिरण्याऐवजी त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या अळंब्यांना प्रोत्साहन कोण देतो याचा शोधही खरे तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा.
सुदिन फोंड्यात सक्रिय
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी वेगळा विचार मांडलाच आहे. तसा प्रत्येक नेता स्वतःला अनुकूल अशा चाली खेळतच असतो. फोंड्यात सध्या सुदिन ढवळीकर सक्रिय झालेले आहेत. एरवीही गाजावाजा न करता ते फोंड्यात अनेकांची कामे करायचे. म्हणूनच तर लवू मामलेदारना ते आमदार करू शकले. डॉ. केतन भाटीकर जवळपास आमदार झाले होते. जो नेता इतरांना उभे करून निवडून आणू शकतो तो स्वतःच त्या मतदारसंघात निवडणूक लढला तर काय होईल हे सांगायचा भविष्यवेत्त्याची गरज नाही. सुदिन यांचे समर्थक खासगीत सांगतात की फोंड्यात सुदिननी निवडणूक लढवली तर केवढाही मोठा नेता विरोधात असू दे, ढवळीकर आरामात निवडून येतील. वारंवार सर्व्हे करणाऱ्या भाजपला हे वेगळे सांगायची गरजच नसेल. त्यांच्याकडे सर्व्हे तयारच असेल.
मिकी पाशेको अडचणीत
नेहमी चांगले कर्म करावे असे जुने जाणते लोक सांगत ते काही चुकीचे नाही. तुमचा भूतकाळ कधीही वर्तमानात येऊन तुमच्या मानगुटीवर बसू शकतो. अलीकडेच आझाद मैदानावर येऊन काँग्रेसमध्ये तिकिटे विकली जातात असा आरोप करणाऱ्या मिकी पाशेको यांच्याविरोधात एका जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहे. राजकुमार यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, जीन के घर शीशे के हो, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.
उमेदवारी नाकारलेले मगोचे उमेदवार ?
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी एका-एका मतदारसंघासाठी विशेषतः भाजपकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार तयारी करत आहेत. पेडणेसारख्या मतदारसंघात तर आपण भाजपचेच उमेदवार असणार, असे सांगणारे किमान चार उमेदवार तयार झाले आहेत. विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर त्यामुळेच दडपणात आहेत. इतर अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. मात्र, या उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली नाही, तर इतर पक्षाची उमेदवारी मिळू शकते. गोव्यात भाजप आणि मगो यांची युती आहे. ही युती कायम राहिली तर भाजपने नाकारलेले उमेदवार मगोमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, युती फिस्कटली तर भाजपने नाकारलेले नेते मगोचे उमेदवार ठरू शकतात. यापूर्वी असे घडले आहे.
कुळ मुंडकारांचा प्रश्न सोडवाच
गोवा मुक्तीनंतर कुळ मुंडकारांचा प्रश्न सोडवण्याची आश्वासने अनेक सरकारांनी दिली. काहींनी त्या दिशेने प्रयत्नही केले. मात्र, आजही गोव्यात कुळ मुंडकारांची समस्या कायम आहे. भाटकार व कुळ यांच्यात न्यायालयात प्रकरणे अनेक वर्षे रखडलेली आहेत. काही जागी कुळांनी विकलेल्या जागी लोकांनी घरे बांधली आहेत. मात्र, ती नावावर होत नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुळ मुंडकार प्रश्न तीन महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. तीन महिन्यांऐवजी एक वर्ष घ्या; मात्र ही समस्या सोडवाच, अशी मागणी वजा सूचना अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
संयुक्त आघाडीच्या मागणीला दुजोरा
२०२७ च्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम आदमी पक्षाने केले आहे. आपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, हे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या विधानानंतर करण्यात आले आहे. चोडणकर यांनी अलीकडेच भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या ऐक्याची गरज असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, भाजपविरुद्ध संयुक्त आघाडी स्थापन करण्याच्या या मागणीला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी दुजोरा दिला आहे. तरीही, एक प्रश्न कायम आहे: हे पक्ष केवळ शाब्दिक घोषणांपलीकडे जाऊन ऐक्याच्या आवाहनाचे प्रत्यक्ष कृतीत कधी रूपांतर करतील? आता केवळ वाट पाहणेच बाकी आहे.
माजी आमदारांची सत्तेची स्वप्ने
भारतीय जनता पक्षातच राहून पक्षासाठी अनेक वर्षे काम केलेले मात्र सध्या आमदार नसलेले काही माजी मंत्री, माजी आमदार पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्यास इच्छुक आहेत. माजी भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी राज्यसभा खासदार तथा माजी मंत्री विनय तेंडुलकर हे सावर्डे मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. त्यासाठी त्यांनी कामही सुरू केले आहे. दुसरीकडे थिवी मतदारसंघातून माजी आमदार व विद्यमान राज्यसभा खासदार तसेच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, दोन्ही जागी सध्या भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे त्यांना वगळून भाजपच्या या मूळ नेत्यांना उमेदवारी देणार का, ते पाहावे लागेल.
कुणीही निवडून आले तरी फातोर्डाच फॉरवर्ड
सध्या काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष अनुक्रमे गिरीश चोडणकर, दामू नाईक व विजय सरदेसाई हे फातोर्डातीलच आहेत. येत्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी विजय फातोर्डाचाच होणार अशी एक उदारमतवादी मांडणी विजय सरदेसाई यांनी एका मुलाखतीत केली आहे. दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी मी लढत नाही. मी माझे काम लोकांसमोर ठेवून मला निवडून द्या, असे सकारात्मक आवाहन करतो. लोक ठरवतील. फातोर्डा मतदारसंघ 'फॉरवर्ड' आहे. तिथे हिंदू, ख्रिश्नच, मुस्लिम मतदार आहेत आणि सर्व गुण्यागोविंदाने नांदतात. इथे धार्मिक कलह होत नाही, असे विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे.