चावडी-काणकोण येथील सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न 
गोवा

Goa News : चावडी-काणकोण येथील सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न

डाव फसल्यामुळे सात चोरट्यांनी केली पोलिसांवर दगडफेक

पुढारी वृत्तसेवा

चावडी ः चावडी-काणकोण येथील प्रवीण मोहन वेर्णेकर यांच्या घराच्या कुंपणाच्या आत असलेले सराफी दुकान मंगळवारी मध्यरात्री फोडण्याचा चोरांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला. हे सर्व चोर तयारीने पिकास व पारय घेऊन आले होते.

दरम्यान, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारला. त्यांनी प्रवीण वेर्णेकर यांच्या दुकानाच्या शटर्र्सची कुलपे तोडली तसेच दुकानाच्या शेजारीच सराफी दुकानाचे मालक प्रवीण वेर्णेकर यांचे घर असल्याने व घरातील माणसे बाहेर येऊ नयेत याकरीता घराच्या मुख्य दरवाजा दोरखंडाने बांधला. चावडी येथे रात्रपाळीवर असलेल्या यशवंत गाड देसाई व इतर पोलिसांना आवाज आल्याने ते आवाजाच्या दिशेने दोनवेळा गेले परंतु त्यांना कुणी दिसले नाहीत. पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना लोखंडी पत्र्यासारखा आवाज आल्यावर ते पुन्हा त्या दिशेने गेले असता पोलिसांना 7 ते 8 जणांचे टोळके नजरेस आले. पोलिस त्याना पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धावू लागले तर या चोरट्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली व चोर पळून गेले. तरी पोलिस त्यांच्या पाठीमागे धावले तरी ते सापडले नाहीत.

चोरट्यांनी मुख्य दरवाजाला बांधलेले दोरखंड पोलिसांनी सोडून प्रवीण व इतरांना घरातून बाहेर येण्यास मार्ग मोकळा करून दिला. चोर चोरी करण्यास आले होते. चोरटे जेवणसुद्धा बरोबर घेऊन आले होते. तर धारधार पिकाससुद्धा घेऊन आले होते. चोरांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही. केमरे पेंट मारून बंद केल्याने सीसीटीव्हीत चोरटे दिसले नाहीत. गस्तीवरील पोलिसानी आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यावर बसस्थानकावर, रेल्वे स्थानकावर व इतर ठिकाणी तपासकार्यास सुरुवात केली. मात्र चोरटे मिळू शकले नाहीत. त्यानंतर सकाळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गोव्याच्या विविध भागांत सध्या चोरीच्या, दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी प्रवीण वेर्णेकर यांनी केली आहे. जेथे जेथे परराज्यांतील लोक भाडेकरू म्हणून राहतात, त्यांची सखोल तपासणी केल्यास चोरीच्या घटना आटोक्यात येऊ शकतील, असे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT