

पणजी : 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा गुरुवारी दुपारी 3.30 वा. पहिल्यांदाच खुल्या जागेत कांपाल-पणजी येथे जुन्या गोमेकॉसमोरील प्रशस्त जागेत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. देश-विदेशी कलाकारांसह चित्रपट रसिकांची मांदियाळी महोत्सवात असणार आहे. उद्घाटन सोहळ्यास दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रामचरण, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार असून समारोप सोहळ्यावेळी आमीर खान यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यंदाच्या इफ्फीत 127 देशांमधून आलेल्या प्रवेशिकांपैकी 84 देशांचे 270 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाची सुरुवात दि ब्ल्यू ट्रेल या ब्राझिलियन चित्रपटाने होणार आहे. याशिवाय, चित्रपट रसिकांना पणजीतील आयनॉक्स, पर्वरीतील आयनॉक्स, मडगाव येथील रवींद्र भवन आणि मिरामार समुद्रकिनार्यावरील खुल्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्याला जे निमंत्रित आहेत त्यांनाच बसण्याची संधी मिळेल, इतरांना उभे राहून सोहळा पाहावा लागणार आहे.
इफ्फीत ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल या दोन्ही दिग्गजांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या प्रतिष्ठित कार्याची, व्यापक लोकप्रियतेची आणि दशकांपासून भारतीय चित्रपट सृष्टीला आकार देण्यातील योगदानाची दखल घेऊनच त्यांचा हा गौरव होत असल्याचे, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन म्हणाले.
जुन्या सचिवालयापासून कला अकादमीपर्यंत गोव्यातील 12 चित्ररथ आणि इतर व्यावसायिक 11 चित्ररथांची परेड होईल. यंदा आमिर खान, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, ऋषभ शेट्टी, साई पल्लवी, रमेश सिप्पी, किरण सिप्पी, विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर, बॉबी देओल, खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम यांच्यासोबतच अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी 21 मास्टरक्लासेस आणि पॅनेल चर्चेच्या माध्यमातून ते उपस्थित प्रतिनिधी आणि सिनेरसिकांशी संवाद साधतील. इफ्फीमध्ये 50 महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. याशिवाय पहिल्यांदाच एआय चित्रपट महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा इफ्फी अनोखा ठरणार, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
समारोप सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल रजनीकांत आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गोव्यात 2004 मध्ये इफ्फी सुरू झाली, तेव्हा आमीर खान उपस्थित होते. आता 56 व्या इफ्फीच्या समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संचालनालयाच्या सहकार्याने गोवा सरकारच्या गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) तर्फे इफ्फीची तयारी पूर्ण झाली असून देशी-विदेशी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपट रसिकांचे आगमन गोव्यात सुरू झाले आहे.