Goa International Flight Drop File Photo
गोवा

Goa Charter Flights | गोव्यातील चार्टर विमानांच्या फेऱ्यांमध्ये घट; उष्ण हवामानामुळे परदेशी पर्यटकांचे बुकिंग लांबणीवर

Goa Charter Flights | उष्ण हवामानामुळे परदेशी पर्यटकांचे बुकिंग लांबणीवर; डिसेंबरमध्ये अतिरिक्त उड्डाणांची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय चार्टर हंगाम यंदा नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला असला, तरी परदेशी पर्यटकांची आवक संथ गतीने होत आहे. युरोप, कझाकस्तान आणि इतर देशांमध्ये उबदार हवामान कायम असल्याने अनेक पर्यटक प्रवासाचे बुकिंग उशिरा करत आहेत. त्यामुळे गोव्यातील चार्टर विमानांचा ओघ मंदावल्याचे टूर ऑपरेटर्सनी सांगितले.

युरोपसह भारतातील उष्ण हवामानामुळे पर्यटकांची एकूण मागणी कमी होण्याऐवजी बुकिंगच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे, असे ऑपरेटर्सना वाटते. गोव्यातील हिवाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे असलेले रशियन आणि कझाक पर्यटक त्यांच्या देशातील तापमान सौम्य असल्यास गोव्यात येण्यास विलंब करू शकतात. एल निनोमुळे त्यांच्या देशांमध्ये फारशी थंडी नसून हवामान उबदार आणि आल्हाददायक राहते.

बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर लोक बाहेर पडून प्रवास करू लागतात, असे केपेर ट्रॅव्हल्सच्या कार्यकारी संचालिका अबिदा कुमार यांनी सांगितले. विमान बुकिंग करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. अनेक परदेशी पर्यटक बुकिंगसाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहतात, असे कुमार म्हणल्या. देशातील तापमान सौम्य असल्यास देशांतर्गत पर्यटकही पर्यटनाचे नियोजन करू शकतात, असे केपेर ट्रॅव्हल्सच्या कार्यकारी संचालिका अबिदा कुमार यांनी सांगितले.

दरकपातीद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारपेठेत गोव्याला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी विमान कंपन्या आणि हॉटेलचालक दर कमी करत आहेत. चार्टर ऑपरेटर्स विमानांची तिकिटे स्वस्त करत असून, हॉटेलही पहिल्या काही चार्टर उड्डाणांसाठी आकर्षक पॅकेजेस देत आहेत, अशी माहिती एका हॉटेलचालकाने दिली.

मॉस्कोहून आलेल्या विमानातून २८५ हून अधिक प्रवासी दाखल झाले. रशियातून आठवड्यातून पाच चार्टर उड्डाणे होत असून, ही संख्या वाढून नऊ होण्याची अपेक्षा आहे. कझाकस्तानचे पहिले चार्टर विमान २६ ऑक्टोबर रोजी येणार आहे. अलमाटीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७७ प्रवाशांना घेऊन चार्टर विमान दाखल होणार आहे.

तसेच नूर-सुल्तानहून १८९ प्रवाशांना घेऊन विमान गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रवास करण्याबाबत पर्यटक उत्सुक असल्याने डिसेंबरमध्ये अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याची शक्यता ऑपरेटर्सनी व्यक्त केली.
युरोपमधील काही भागांत हंगामाच्या अखेरीस झालेल्या उष्णतेच्या प्रभावामुळे ऑक्टोबरमध्ये सामान्यतः सामान्यपेक्षा उष्ण हवामान राहिले. पश्चिम आणि दक्षिण युरोपातील अनेक प्रदेशांमध्ये तापमान हंगामी सरासरीपेक्षा ८ ते १२ अंशांनी वाढले. त्यामुळे पर्यटकांच्या प्रवासाच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT