CM Pramod Sawant 
गोवा

Goa News | गोव्यात 40 वा राज्य दिन सोहळा उत्साहात! समान नागरिक कायद्यासह सर्वधर्मसमभावासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री

Goa News | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण, योजनांचा प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

समान नागरिक कायदा असलेले गोवा हे देशातील एकमेव राज्य असून, धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव जपत राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कला अकादमी येथे शनिवारी आयोजित ४० व्या राज्य दिन सोहळ्यात ते बोलत होते.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गणपती राजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री व आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गोवा ही देवदेवतांची भूमी असून अनेक आक्रमणांनंतरही गोवेकरांनी आपली संस्कृती जपली आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत राज्य त्यांच्या प्रति कृतज्ञ असल्याचे त्यांनी नमूद केले. वारसा स्थळांचे संरक्षण करताना आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. लहान राज्य असूनही गोव्याने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

केंद्र व राज्यातील 'डबल इंजिन' सरकारमुळे विकास प्रकल्पांना गती मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोवा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे, असेही सावंत म्हणाले. या प्रसंगी दीर्घकाळ कार्यरत आस्थापनांना 'गोवन आयकॉनिक ब्रँड' पुरस्कार प्रदान करण्यात आले. नव्याने नियुक्त १२० उपनिरीक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

दूध उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैशाली नाईक, अनंत मळीक व राधा तिंबलो यांना 'गोपाल रत्न' पुरस्कार देण्यात आला. साईराज फडते यांना 'स्वयंपूर्ण मित्र' तर हरवळे पंचायतीला 'स्वयंपूर्ण ग्रामपंचायत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सरपंच गौरवी नाईक यांनी स्वीकारला. व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 'गोवा इंजिनिअरिंग नेक्स्ट एरा' या कॉफी टेबल पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुधारित दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेत विमा संरक्षणात वाढ करण्यात आली असून, चार सदस्यांच्या कुटुंबासाठी आता ४ लाख रुपयांचे कवच, तर चारपेक्षा जास्त सदस्यांसाठी ६ लाख रुपयांचे कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ४४७ उपचारांचा समावेश असून राज्यातील सुमारे ११ लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेसाठी २७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT