Goa Post Office File Photo
गोवा

Bori Post Office | बोरी टपाल खात्यात अनागोंदी कारभार

Bori Post Office | नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने अडचणी

पुढारी वृत्तसेवा

बोरी : पुढारी वृत्तसेवा

बोरी येथील टपाल खात्याच्या कथित अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, अनेक तरुण सरकारी नोकरीच्या संधींपासून वंचित राहत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. महत्त्वाची सरकारी कागदपत्रे वेळेत न मिळाल्यामुळे विविध शासकीय व्यवहारांमध्येही अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन वर्षांत कंत्राटी पोस्टमन वारंवार बदलत असल्याने टपाल वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. नव्याने नियुक्त होणारे पोस्टमन काही महिन्यांतच नोकरी सोडत असल्याने टपाल वेळेवर वितरित होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सध्या फोंडा येथील प्रधान टपाल कार्यालयातील एक अधिकारी बोरी येथे येऊन, ज्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत अशा नागरिकांशी संपर्क साधून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालयात येऊन टपाल घेऊन जाण्याची सूचना करतात. मात्र, अनेक नागरिकांशी संपर्क होत नसल्याने त्यांची महत्त्वाची पत्रे कार्यालयातच पडून राहतात.

वाहतूक खाते, शिक्षण खाते, कला व संस्कृती संचालनालय, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर संबंधितांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे. बोरी-देऊळवाडा येथील एका तरुणाला शिक्षण खात्याच्या नोकरीसंदर्भातील पत्र परीक्षा झाल्यानंतर तब्बल महिनाभराने मिळाल्याचे सांगण्यात आले.

तसेच एका नामांकित संस्थेला सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भातील पत्र पाठविण्यात आले होते; मात्र ते आजतागायत प्राप्त झाले नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे अनेक नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असून, फोंडा येथील प्रधान टपाल कार्यालयाने तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा बोरी येथील टपाल कार्यालय बंद करून त्याचा कारभार थेट फोंडा येथून चालवावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT