Goa News 
गोवा

Goa Board HSSC Result 2026 | गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर! 92.96 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Board HSSC Result 2026 | बारावीचा निकाल ९२.९६ टक्के; ८५२९ विद्यार्थिनी उत्तीर्ण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२६ मधील बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. यंदा एकूण ९२.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात वाढ झाली झाल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली. या निकालात मुलीच भारी ठरल्याचे दिसून आले.

पर्वरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे आणि सह सचिव श्रेया कासकर उपस्थित होत्या. ते म्हणाले, बारावीच्या परीक्षेला एकूण नियमित १७,२८३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १६,०६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये ८२०३ मुलांपैकी ७५३८ विद्यार्थी म्हणजेच ९१.८९ टक्के उत्तीर्ण झाले तर ९०८० मुलींपैकी ८५२९ विद्यार्थिनी म्हणजे ९३.९३ टक्के मुली उत्तीर्ण होऊन त्यांनी यंदाही आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ९३.९० टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. त्यानंतर वाणिज्य ९२.९०, व्यावसायिक ९२.२७ आणि कला शाखेने ९२.२१ टक्के मिळवले आहेत.

यंदाच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी दिसून आली. ८८८ विद्याथ्यापैकी पैकी ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ९५.७२ टक्के लागला आहे. राज्य सरकार, गोवा बोर्ड आणि शिक्षण विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अधिक चालना मिळत असल्याचे अध्यक्ष शेट्ये यांनी नमूद केले. तालुकानिहाय निकालात पेडणे तालुक्याने ९५.९७ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले. सासष्टी ९५.१७ आणि तिसवाडी ९५.११ टक्के मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.

धारबांदोडा आणि सत्तरी तालुक्यांचा निकाल तुलनेने कमी राहिला. विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ तसेच डिजीलॉकर अॅपवर पाहता येणार आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रिया...

उत्तरपत्रिकेची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज २७ मार्चपासून सुरू होणार असून, पुरवणी परीक्षा एप्रिलअखेरीस होण्याची शक्यता आहे. एकूणच, यंदाचा निकाल समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT