पणजी : पुढारी वृत्तसेवा
येत्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच ५१ टक्के मते मिळवून किमान ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने ठेवले असून त्यादृष्टीने निवडणूक कामकाज सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. काही मतदारसंघांमध्ये नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पणजी येथे शनिवारी (दि. १३) भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीला माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, सरचिटणीस सर्वानंद भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, भाजप हा संघटनात्मक पातळीवर सातत्याने सक्रिय असणारा पक्ष आहे.
निवडणूक असो वा नसो, पक्षाचे काम सुरूच असते. आजच्या बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उमेदवारी निवड प्रक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रदेश समितीने पक्षाचा कृती आराखडा केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केला आहे.
उमेदवारी ठरवताना विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवार यांचा पक्षासाठीचा योगदान, जनसंपर्क, विकासकामांतील सहभाग, जनसेवा आणि मतदारसंघातील लोकप्रियता यांचा सविस्तर विचार केला जाणार आहे. 'काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. पक्षासाठी सक्रियपणे काम न करणाऱ्यांना पक्षात स्थान राहणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट वीज मीटरबाबत जनजागृतीची गरज
स्मार्ट वीज मीटर बसवण्यापूर्वी वीज खात्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही दामू नाईक यांनी सांगितले. कोणताही नवीन उपक्रम राबवताना त्याबाबत लोकांना माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. जे ग्राहक कमी लोड दाखवून अधिक वीज वापरतात, त्यांनाही याबाबत समज देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
'सर्वसामान्य नागरिकांना अचानक वाढीव बिल येणे अयोग्य आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले. स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगून, जनजागृतीनंतरच स्मार्ट मीटर बसवणे योग्य ठरेल, अशी भूमिका पक्षाने मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या स्मार्ट मीटर योजना स्थगित ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.