BJP Pudhari
गोवा

Goa BJP Internal Politics | नेत्यांचे नाराजीनाट्य; माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदारांची घोषणा

Goa BJP Internal Politics | भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांमध्ये नाराजीनाट्य असताना सत्ताधारी भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार, अशी घोषणा भाजपच्या माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी मंत्री व माजी आमदारांनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर 'पक्ष' संकट उभे राहणार आहे.

भाजप सोडून इतर पक्षात न गेलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या सोबत २०२२ च्या निवडणुकीत आपल्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेले माजी मंत्री महादेव नाईक, २०१७ मध्ये मगोतर्फे लढलेले बाबू आजगावकर, भाजपचे माजी आमदार राहिलेले किरण कांदोळकर यांनीही अपक्ष लढण्याची घोषणा केलेली आहे.

तसेच पणजीतून उत्पल पर्रीकर यांनीही भाजपची उमेदवारी न मिळाल्यास पुन्हा अपक्ष लढण्याची तयारी आहे. यावरून भाजपचे माजी नेते काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये न जाता अपक्ष राहून पक्षाला ताकद दाखवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.

२०२२ च्या निवडणुकीमध्ये मांद्रे मतदारसंघातून भाजपने दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले प्रा. पार्सेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्याचा फायदा मगोचे उमेदवार जीत आरोलकर यांना झाला. आरोलकर यांना १०,२४३ मते मिळाली, भाजपचे दयानंद सोपटे यांना ९४७५ मते मिळाली. प्रा. पार्सेकर यांनी अपक्ष राहून ५६२३ मते घेऊन आरोलकर यांचा विजय सुकर केला.

पार्सेकर अपक्ष राहिले नसते तर दयानंद सोपटे किमान चार ते साडेचार हजार मतांनी जिंकले असते. आता पुन्हा एकाच तोच प्रकार होण्याची शक्यता आहे. कारण फोंडा व पेडणेवरून मगो व भाजपामधील वाद वाढून युती तुटण्याचीच जास्त शक्यता आहे.

२०२२ मध्ये पेडण्याचे तत्कालीन आमदार बाबू आजगावकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र भाजपने त्यांना डावलून प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी दिली. ते १३,०६३ मते घेऊन जिंकले. आजगावकर यांना मडगावची उमेदवारी भाजपने दिली. मात्र ते पराभूत झाले. पुन्हा ते पेडणेतून भाजपची उमेदवारी मागत आहेत, नाहीपेक्षा अपक्ष लढण्याचा दावा करत आहेत.
शिवोलीमध्ये २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या दिलायला लोबो या नंतर इतर आमदारांसह भाजपामध्ये आल्या. २०२२ मध्ये त्यांना ९६९९ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार राहिलेले माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना ७९७२ मते मिळाली. आता विद्यमान आमदार म्हणून लोबो यांना भाजप संधी देण्याची शक्यता असल्याने भाजपची उमेदवारी न मिळाल्यास मांद्रेकर अपक्ष राहणार असे सांगत आहेत.

शिरोडा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर दोनवेळा निवडून आलेले, मात्र २०२२ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्याने आपल्या उमेदवारीवर लढलेले माजी मंत्री महादेव नाईक अपक्ष लढणार असल्याचे सांगत आहेत. २०२२ च्या निवडणुकीत भाजपचे सुभाष शिरोडकर यांना ८३०७ मते तर आपतर्फे महादेव नाईक यांना ६१३३ मते मिळाली होती.


पणजी मतदारसंघाचा विचार करता बाबूप मोंसेरात हे मंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा भाजप त्यांनाच उमेदवारी देईल. २०२२ च्या निवडणुकीत मोंसेरात यांना ६७८७ मते मिळाली होती, तर अपक्ष राहिलेले उत्पल पर्रीकर यांना ६०७१ मते मिळाली होती. यावेळी भाजपने उमेदवारी दिली नाही तर पर्रीकर पुन्हा अपक्ष उमेदवार राहतील हे निश्चित.

थिवीचे माजी भाजप आमदार किरण कांदोळकर यांनीही भाजपची उमेदवारी मिळाल्यास घेईन नाहीपेक्षा अपक्ष राहीन, अशी घोषणा केली आहे. कांदोळकर हे सध्या भाजपामध्ये नाहीत. २०२२ च्या निवडणुकीत ते स्वतः तृणमूलच्या उमेदवारीवर हळदोण्यात उभे राहिले तर त्यांच्या पत्नी जि. पं. सदस्या कविता कांदोळकर या थिवीतून उभ्या राहिल्या.

भाजपचे उमेदवार व सध्याचे मंत्री निळकंठ हलर्णकर यांना थिवीत ९४१४ तर कविता कांदोळकर यांना ७३६३ मते मिळाली होती. या नेत्यांव्यतिरिक्त अन्य अनेक भाजप नेते उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असून, तसे झाल्यास मत विभागणी होऊन २०२२ मध्ये मडगावात झाले तशी भलत्यालाच संधी मिळू शकते.

प्राचार्य पार्सेकर यांनी तर गोव्यात भाजप रुजावा यासाठी अथक परिश्रम घेतले. या नेत्यांची हिंदुत्ववादी विचारधारा इतर पक्षांशी जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसचे किंवा इतर पक्षांकडून त्यांना ऑफर आल्या तरी त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपच्या सरकारने भरीव असा विकास केलेला असल्यामुळे भाजपची उमेदवारी मिळाली म्हणजे अर्धी लढाई जिंकली, असे अनेक नेत्यांना वाटते त्यासाठी भाजपची उमेदवारी ते मागत आहेत.

...तर कुडचडेतून काब्राल अपक्ष?

सांगे एसटीसाठी राखीव झाला तर येथील आमदार व समाज कल्याण मंत्री सुभाष फलदेसाई हे कुडचडे मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की इतर पक्षात जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT