पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या प्रकरणातील संशयित परदेशी नागरिक यानिव बेनाहिन ऊर्फ अटाला याला एनडीपीएस विशेष न्यायालयाने मंजूर केलेल्या अर्जात त्रुटी असल्याने जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द करून त्याच्या जामीन अर्जावर नव्याने फेरसुनावणी घेण्याचे निर्देश दिले.
पोलिसांनी संशयिताच्या जामीन अर्जाला गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. राज्य सरकारने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, परदेशी नागरिकाला जामीन देताना सत्र न्यायालयाने पुरेशी कारणे नोंदवली नाहीत किंवा आवश्यक अटी घातल्या नाहीत. त्यामुळे जामीन आदेशात कायदेशीर त्रुटी असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या अर्जावरील सुनावणीवेळी सरकारी पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने न्यायालयाचा जामीन आदेश कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे नमूद करत तो रद्दबातल ठरविला.
तसेच हे प्रकरण पुन्हा एनडीपीएस विशेष न्यायालयाकडे पाठवून एका महिन्याच्या आत नव्याने जामीन अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र, न्यायालयाने यासोबत एक महत्त्वाचा अंतरिम दिलासादेखील दिला आहे. नव्याने जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत संशयित अटालाच्या स्वातंत्र्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
म्हणजेच, नवीन निर्णय होईपर्यंत तो सध्या जामिनावरच राहणार आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाने संशयित अटाला याला एप्रिल २०२५ मध्ये ड्रग्सप्रकरणी अटक झाली होती.