फोंडा : प्रियोळ मतदारसंघ यावेळेला अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवला जाण्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीने व्यूहरचनेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुळात या मतदारसंघात दोनपेक्षा जास्तवेळा आमदार निवडून येत नाही, असा इतिहास आहे. विद्यमान आमदार गोविंद गावडे या इतिहासाला छेद देऊन तिसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात का याबाबत आता उत्सुकता आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोविंद गावडे व मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी गोविंद गावडे यांना ११ हजार १९ मते मिळाली होती, तर दीपक ढवळीकर यांना १० हजार ८०६ मते पडली होती. हे दोन्ही उमेदवार प्रियोळ मतदारसंघातील नसूनही त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती.
दुसऱ्या बाजूला खुद्द प्रियोळ मतदारसंघाचे मतदार असलेले आणि अपक्ष उमेदवारी दाखल केलेले उद्योजक संदीप निगळे आणि आरजीचे उमेदवार विश्वेश नाईक यांनी आपले अस्तित्व दर्शवले होते. हा मतदारसंघ एसटींसाठी राखीव झाल्यास भाजप -मगो आणि काँग्रेस पक्षाने त्यादृष्टीने तयारी ठेवली आहे. सध्या विविध राजकीय पक्षांकडून मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र बहुतांश मतदार 'सायलंट' असल्याने मतदारांचा अंदाज घेणे मुश्किल ठरले आहे. त्यामुळे प्रियोळ मतदारांचा कौल कुणाला हे नंतरच स्पष्ट होणार आहे.
मगो- भाजप युतीवर मांडणी! विधानसभा निवडणुकीत मगो - भाजप युती होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. युती होऊन हा मतदारसंघ भाजपला सोडला तर साहजिकच भाजपतर्फे गोविंद यांना राज्यात येत्या उमेदवारी निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला युतीमुळे हा मतदारसंघ मगोला सोडल्यास आणि एसटी राखीव झाल्यास मगोचे संभाव्य उमेदवार दीपक ढवळीकर यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे.
राखीव झाल्यास इतर पर्याय
मगोला हा मतदारसंघ सोडल्यास आणि एसटी राखीव झाल्यास मगोतर्फे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी किंवा सामाजिक कार्यकर्ते मच्छींद्र शिरोडकर यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो. सध्या तरी या जरतरच्या गोष्टी आहेत. निवडणूक जाहीर होईपर्यंत बऱ्याच घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संभाव्य उमेदवार
भाजपतर्फे गोविंद गावडे, मगोतर्फे दीपक ढवळीकर व एसटी झाल्यास सुनील जल्मी किंवा मच्छींद्र शिरोडकर, याशिवाय काँग्रेस, आरजी उमेदवार निश्चित होणार असून काही अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.