goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Assembly | विरोधकांची घोषणाबाजी; दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब

सभापती डॉ. गणेश गावकर यांनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले

पुढारी वृत्तसेवा

Goa Legislative Assembly Session 2026

पणजी : विरोधी पक्षाच्या आमदारांच्या गदारोळामुळे सोमवारी (दि.१६) विधानसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. खासगी विधेयके चर्चेला घेण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. परिणामी सभापती डॉ. गणेश गावकर यांनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सोमवारी विरोधी पक्षातील सर्व आमदार काळे कपडे परिधान करून विधानसभेत दाखल झाले होते. यापूर्वीही शुक्रवारी विरोधकांनी गदारोळ घालत कामकाजात व्यत्यय आणला होता. त्याच धर्तीवर सोमवारीही कामकाज सुरू होताच विरोधकांनी खासगी विधेयकांवर चर्चा घ्यावी, अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर होऊ शकला नाही.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कामकाज सुरू होताच खासगी विधेयकाचा मुद्दा उपस्थित करून त्यावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी खासगी विधेयकांचा दिवस नसून तो शुक्रवारी असतो, त्यामुळे सोमवारच्या नियोजित कामकाजात अडथळा आणू नये, अशी सूचना विरोधकांना केली. मात्र विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यांनी फलक झळकवत निदर्शने केली.

गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभापती डॉ. गणेश गावकर यांनी सुरुवातीला अर्धा तासासाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दरम्यान, आमदार निलेश काब्राल यांनी विरोधकांना खासगी विधेयके कशी सादर केली जातात हेही माहिती नसल्याची टीका केली. तर आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रश्नोत्तराचा तास तरी घेऊ द्या आणि कामकाजात अडथळा आणू नका, अशी विनंती केली. मात्र विरोधक आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याने सभापतींना पुन्हा कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT