Goa Tourism  
गोवा

Goa Tourism | गोव्याच्या सुगम्य पर्यटन उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Goa Tourism | दिव्यांग क्षेत्रातील आणि सुगम्य पर्यटनातील आमच्या उपक्रमांना राष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळणे ही गोव्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

पुढारी वृत्तसेवा

सांगे : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांग क्षेत्रातील आणि सुगम्य पर्यटनातील आमच्या उपक्रमांना राष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळणे ही गोव्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. विकसित भारतासाठी सुगम्य भारत' या सत्राचे नेतृत्व करण्याची आणि त्याचे निष्कर्ष पंतप्रधानांसमोर सादर करण्याची संधी मिळणे ही एक मोठी जबाबदारी आहे.

दिव्यांगजन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्रपणे आणि सन्मानाने सहभागी होऊ शकतील, असे वातावरण निर्माण करण्यासाठी गोवा कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे पार पडलेल्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागीय परिषदेत, अर्थात 'समावेशी नीती संकल्प २०२६' मध्ये सुगम्य आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या गोव्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची 'विकसित भारतासाठी सुगम्य भारत' या महत्त्वाच्या संकल्पनात्मक सत्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. देशाच्या विकास प्रवासात दिव्यांगजनांचा अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित करणे आणि सुगम्यता बळकट करणे यावर या सत्रात प्रामुख्याने भर देण्यात आला.

या सत्रात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी सार्वत्रिक सुगम्यता, सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, सुलभ वाहतूक आणि डिजिटल सेवा या विषयांवर सखोल विचारमंथन केले. फळदेसाई यांनी यावेळी गोव्याचे उपक्रम आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची माहिती दिली. नंतरच्या टप्प्यावर सुधारणा करण्यापेक्षा, नियोजन आणि आराखड्याच्या (डिझाइन) टप्प्यावरच सुगम्यतेचा समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप सत्रात, मंत्र्यांनी 'विकसित भारतासाठी सुगम्य भारत' या विषयावरील चर्चेतून समोर आलेले मुख्य निष्कर्ष आणि शिफारशी सादर केल्या. पंतप्रधानांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

तसेच, दिव्यांगजनांना योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील अंगभूत कलागुण आणि क्षमता ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या परिषदेत सादर करण्यात आलेल्या सर्वोत्तम उपक्रमांमध्ये गोव्याच्या 'सुगम्य पर्यटन' उपक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे या क्षेत्रातील राज्याच्या प्रयत्नांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. दिव्यांगत्वाचे लवकर निदान करणे, वैयक्तिक क्षमता जोपासणे आणि दिव्यांगजनानांमध्ये सन्मान व आत्मसन्मान वाढवणे या गोष्टींचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगजनांच्या गरजांप्रती संवेदनशील

'पर्पल फेस्ट'च्या तीन यशस्वी आवृत्त्यांचे आयोजन करण्याच्या अनुभवामुळे सुगम्यता, सर्वसमावेशकता आणि दिव्यांगजनांच्या क्षमतांचा गौरव करण्याप्रती राज्याची बांधिलकी अधिक दृढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. सार्वजनिक ठिकाणे आणि सेवा अधिक सर्वसमावेशक, सुगम्य आणि दिव्यांगजनांच्या गरजांप्रती संवेदनशील बनवण्यासाठी गोवा निरंतर कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT