गोवा

Government Health Centre | मडगाव-फातोर्डा आरोग्य केंद्रात औषध टंचाई

Government Health Centre | ज्येष्ठ नागरिक हतबल; गोळ्यांसाठी तासन् तास रांगेत राहण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सरकारी आरोग्य यंत्रणेतील नियोजनाच्या अभावाचा सर्वाधिक फटका फातोर्डा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याचे समोर आले आहे. नियमित औषधांचा तुटवडा, आरोग्य केंद्रांच्या वारंवार फेऱ्या आणि रुग्णालयांतील लांबलचक रांगा यामुळे वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. कॅल्शियमच्या गोळ्या तसेच अंगदुखीसाठी लागणाऱ्या पेनकिलर औषधांसाठीही त्यांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र मडगाव व फातोर्डा भागात दिसून येत आहे.

मंगुळ-फातोर्डा येथील ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक एमी डायस यांनी मडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांच्या तुटवड्याबाबत गंभीर तक्रार केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना आवश्यक असलेल्या कॅल्शियम गोळ्या आणि ट्रायको पेन रिलीफ जेल उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वारंवार विचारणा करूनही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाढत्या वयात नियमित औषधोपचार अत्यावश्यक असताना आवश्यक औषधेच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना वारंवार आरोग्य केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. आयुष्यभर समाजासाठी योगदान दिलेल्या वृद्धांना योग्य वैद्यकीय सुविधा आणि आधार मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र औषधांचा साठा उपलब्ध नसल्याची स्पष्ट माहितीही रुग्णांना दिली जात नसल्याने अनेकांना वारंवार आरोग्य केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची तक्रार आहे.

लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या काळात विविध आश्वासने दिली जातात, मात्र त्यानंतर वृद्धांच्या दैनंदिन समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील वाढती गर्दी आणि लांबलचक प्रतीक्षा रांगाही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार नाईक यांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांनी एमी डायस यांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता यावे, यासाठी आरोग्य सेवा, आवश्यक औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय सुविधा मिळणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित होत आहे. विकासाची खरी ओळख ही समाजातील वृद्धांची किती काळजी घेतली जाते यावर अवलंबून असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी लक्ष द्यावे

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असताना ज्येष्ठ नागरिकांच्या या समस्यांवर तातडीने उपाय होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT