पणजी: निर्यात पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, विमल आनंद, आश्विन गोलपकर, पंकज चढा व अन्य मान्यवर. 
गोवा

Engineering exports growth | अभियांत्रिकी उत्पादन निर्यातीत 36 टक्के वाढ

मुख्यमंत्री डॉ. सावंत : ईईपीसी इंडियाचा 42 वा निर्यात पुरस्कार सोहळा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्याच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन निर्यातीत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३६ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पश्चिम भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अभियांत्रिकी निर्यातदार राज्यांमध्ये गोव्याचा समावेश झाला आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय वाणिज्य खाते व अभियांत्रिकी एक्स्पोर्ट्स प्रमोशन कौन्सिलच्या वतीने (ईईपीसी) निर्यात उत्कृष्टतेसाठीच्या ४२ व्या पश्चिम विभागीय निर्यात पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव विमल आनंद, मुंबईचे डेप्युटी डीजीएफटी आश्विन गोलपकर, ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्ढा, उपाध्यक्ष आकाश शहा, कार्यकारी संचालक व सचिव आधिप मित्रा आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, २०२४-२५ मध्ये गोव्याची अभियांत्रिकी निर्यात ४०५.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी होती. ती २०२५-२६ मध्ये वाढून ५५०.६ दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या वाढीमुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्राची क्षमता आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता अधोरेखित झाली आहे. ही कामगिरी गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास, उद्योगांची क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि राज्यातील औद्योगिक परिसंस्थेच्या सातत्यपूर्ण बळकटीकरणाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, भविष्यातही औद्योगिक आणि निर्यात क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असूनही गोव्याने देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप...

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील उद्योगांनी गुणवत्ता, नवकल्पना आणि निर्यातक्षमतेच्या बळावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. त्यामुळे गोवा केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT