

पणजी : प्रदेशाध्यक्ष निवडला आणि राज्यभरा-तील काँग्रेसमध्ये राजकीय वावटळ उठली. तरुण, उमदे अमित पाटकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांच्या जागी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती केली. त्यामुळे पक्षात नाराजीनामा सत्र सुरू झाले आहे.
नियुक्त्तीचे पत्र हाती पडल्यापडल्या काँग्रेसच्या राज्य सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सिद्दीकी म्हणाल्या की, पक्षाला मजबूत करण्यासाठी चार वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम घेतलेल्या अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला २०२७ च्या निव डणूक जिंकण्याची आशा होती. मात्र, च्यि नेतृत्वाखाली २०२२ मध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, त्याच गिरीश चोडणकर यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. चोडणकर तामिळनाडूचे प्रभारी होते, तिथे निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे १८ आमदार होते, पण आता चोडणकर यांच्या कामगिरीमुळे काँग्रेसकडे फक्त ५ आमदार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा न करता गोव्याचे निर्णय दिल्लीतूनच घेतले, असा आरोप करून सिद्दीकी यांनी पदाचा राजीनामा दिला.
त्यासोबत प्रदेश सरचिटणीस मनीषा उसगावकर, डिचोली ब्लॉक अध्यक्ष दत्ताराम शेट्ये, रणजितसिंग राणे यांनीही राजीनामे दिले. दुसरीकडे दक्षिण गोव्यातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांनी खासदार कॅप्टन विरिएतो फर्नाडिस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करीत काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली. फर्नाडिस यांनी आपण खासदार असूनही आपल्याला प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत विश्वासात घेतले नसल्याचा मुद्दा मांडला आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी, तर मी समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सर्व काही सोडून राजकारणात आलो होतो. पण, अचानक घेतलेल्या निर्णयाने मी भावनिक झालो, कारण मीही माणूसच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यातून त्यांनाही या निर्णयाबाबत माहीत नसावे, असेच दिसते. शिवाय, अमित पाटकर पक्षासाठी, पक्षाच्या कामासाठी आपल्या खिशातून पैसे खर्च करायचे. गेली साडेचार वर्षे ते पक्ष बांधणीसाठी झटत होते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
पंचायत निवडणुकीपूर्वी बदलाचा निर्णय...
गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय पंचायत निवडणुकांपूर्वीच झाला होता. राज्यातील नेत्यांना त्याची स्पष्ट कल्पना होती, असे सांगून त्यांनी वाद तूर्त शमवण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपण दोन दिवसांत गोव्यात येऊन नाराजांची समजूत काढीन, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.