पणजी : प्रभाकर धुरी
पालक आणि शिक्षकांनी अल्पवयीन मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक अगदी स्पष्टपणे समजून सांगण्याची गरज आहे, असे मत प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी दै. पुढारीशी बोलताना मांडले. डॉ. पाटकर म्हणाले की, कुमार बयातील मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुली प्रलोभनाला बळी पडतात. अशावेळी पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरते. त्यांनी मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक अगदी स्पष्टपणे समजून सांगायला हवा.
मुलांचे आई वडिलांवर असते ते प्रेमच असते. म्हणून का ते हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट करीत बसत नाहीत. मात्र, आई-वडील आजारी पडले, तर मुलांना काळजी वाटते, ते प्रेम असते. प्रेम आणि आकर्षण यात खूप मोठा फरक असतो. तोच मुलींना समजून सांगण्याची गरज आहे. पालक डॉ. पाटकर म्हणाले की, या वयात मुले भावनिकदृष्ट्या बुद्धिमान किंवा परिपूर्ण नसतात. एखाद्याने प्रशंसा केली, भेटवस्तू दिल्या की त्यांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटते, त्याची सोबत आवडू लागते, त्याच्याबद्दल वेगळीच भावना निर्माण होते.
अर्थात अशी भावना समोरच्या मुलीच्या मनात निर्माण करता येते हे तसा प्रयत्न करणाऱ्यांना माहीत असते. हे सगळे ती बेसावध असताना होते. पहिल्यांदा संपर्क केला जातो, नंतर प्रशंसा केली जाते. भेटवस्तू दिल्या जातात. यातून मुलींना त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होते. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती ऐकायला तयार होते. समोरच्या व्यक्तीच्या उद्देश वासना असेल, तर मग तोही स्वतःची इच्छा नसली, तरी मुलीकडून त्याला गमावण्याच्या भीतीने पूर्ण केली जाते.
असे हे दुष्टचक्र अल्पवयीन मुलीच्या मनात आकर्षण निर्माण करून सुरू होते. यात सौंदर्याचा निकष महत्वाचा ठरत नसतो, तर सतत संपर्क हाच निकष महत्वाचा ठरतो. डॉ. पाटकर म्हणाले की, यासाठी मुलींना चार गोष्टी समजावून सांगण्याची गरज आहे. मुलींनीही त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट मुलीला ओळखता यायला हवी की, आपल्याला वाटते ते प्रेम आहे की आकर्षण, आकर्षण काही काळापुरते असते, समोरच्याने टाईमपासच्या हेतूने ठरवून संपर्क साधला असेल, तर ते आकर्षण, ती भावना जशी येते तशी निघूनही जाते.
एकाच्या डोक्यातून ती गेली की त्याचा त्रास दुसऱ्याला होतो. त्यामुळे मुलींना ही भावना प्रेम आहे की आकर्षण हे ओळखता येणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे ही भावना हाताळता येणे. तिसरा मुद्दा आहे समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना, उद्देश ओळखता येणे आणि चौथा मुद्दा आहे, ती भावना ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देणे. यात मुलींनी नाही म्हणायला शिकण्याची अत्यंत गरज आहे.
या चार मुद्द्यांबाबत पालक आणि शिक्षकांनी कुमार वयातील मुलींना शिक्षित करण्याची गरज आहे. डॉ. पाटकर म्हणाले की, अलीकडे ऑनलाईन ओळखीचे प्रमाण वाढले आहे. तिथे माणसे न भेटताही फोटो वैगरे पाहून एकमेकांबद्दल भावना तयार होतात. तीही अचानक येणारी व अचानक जाणारी भावना असते. काही घटनांमध्ये मोठ्या वयाचे तरुण अल्पवयीन किंवा लहान वयाच्या मुलींना ठरवून लक्ष्य करतात.
त्यांच्या मनात संपर्क करून, प्रशंसा करून आणि भेटवस्तू देऊन आपल्याबद्दल आकर्षण निर्माण करतात. आकर्षण, भावना आणि वासना असा तो प्रवास सुरू होतो आणि मग लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात आणि उघडकीसही येतात. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी मुलींना सगळे धोके समजावून सांगणे आवश्यक ठरते.
ते म्हणाले, शेवटी भावनेतून निर्माण झालेले आकर्षण वासनेपर्यंत पोहोचते. माझ्याकडे येणाऱ्या काही महिलांचे अनुभव धक्कादायक आहेत. लैंगिक छळाच्या किंवा भावनिक आकर्षणाच्या घटनांमध्ये मुलीच्या शारीरिक अवस्थेपेक्षा मानसिक अवस्था अधिक कारणीभूत असते. कुमार वयातील मुली समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, ते ओळखू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. भावनिक बुद्धीमत्ता नसल्याने तात्पुरती निर्माण झालेली भावना ओढ आणि आकर्षणात परावर्तीत होते.
मुलांवरही संस्कार आवश्यक
पालकांकडे मुबलक वेळ असूनही पालक मुलांना वेळ देत नाहीत. पालकांनी मुलीची जशी काळजी घ्यायला हवी, तसे मुलांवरही संस्कार करायला हवेत. तो चुकीचा वागत नाही ना, बाहेर कुठल्या मुलींची फसवणूक करत नाही ना याची खातरजमा करायला हवी. मुला मुलींना योग्य शिक्षण दिल्यानेच निकोप समाज निर्माण होऊ शकतो. तीच आजची गरज आहे.
सामाजिक पालकत्वाची पुन्हा गरज
पूर्वी कोण कुणाबरोबर जातो, कोण कसा वागतो यावर घरातील व्यक्तींचे आणि समाजाचे लक्ष असायचे. लहान मुलींना कुणी फशी पाडत असेल, तर त्याला जाब विचारला जायचा, मुलींची सगळे समजूत काढायचे आणि प्रकरण संपायचे. आता ते सामाजिक पालकत्व (सोशल परेंटिंग) दिसत नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात पालक म्हणू डोकावून पाहण्यापेक्षा प्रत्येकजण आपल्यापुरते पाहू लागल्याने समाजात लव्ह जिहाद, सेक्स स्कैंडल सारख्या घटना घडू लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठी पुन्हा सामाजिक पालकत्वाची गरज आहे.