

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कुडचडे येथील कथित सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मडगाव येथे तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या एका शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीचे तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान शाळेतील एका शिक्षिकेकडून झालेला अमानुष छळाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
त्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मनात भीती, अपमान आणि वेदनेचे वादळ अद्यापही शांत झालेले नाही. या तीव्र मानसिक तणावाच्या अवस्थेतच परीक्षा सुरू होण्यापूर्वी ती पायऱ्यांवरून खाली कोसळली आणि जखमी झाली. त्यामुळे तिला इयत्ता नववीची अंतिम परीक्षा तिला देता आली नाही.
शिक्षण खात्याकडून तिच्या या छळाची गंभीर दखल घेता न आल्याने आज ती विद्यार्थिनी केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक वेदनांशी झुंज देत आहे. शिस्त आणि मूल्यांचे धडे देणाऱ्या शिक्षिकेकडूनच विद्यार्थिनीवर अमानुष वागणूक दिल्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात असून त्या शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थिनीला तिच्या मासिक पाळीच्या काळात शाळेतील एका शिक्षिकेकडून मानसिक, शारीरिक व भावनिक छळ सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार तीन महिन्यांपूर्वी समोर आला आहे.
या घटनेनंतरही संबंधित शिक्षिकेविरोधात शिक्षण खात्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालक संताप व्यक्त करत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या परीक्षांच्या काळातच या विद्यार्थिनीवर आलेल्या मानसिक तणावाची मर्यादा गाठली आहे. भीती, अपमान आणि सततच्या दबावामुळे तिची मानसिक अवस्था इतकी खालावली की ती एकही पेपर देण्यासाठी शाळेत जाऊ शकली नाही. तिच्यासाठी केवळ शैक्षणिक नुकसान नाही, तर तिच्या आत्मविश्वासावर झालेला एक गंभीर आघात मानला जात आहे.
समुपदेशनाच्या नावाखाली दबाब ?
शाळेत समुपदेशनाच्या नावाखाली विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असल्याचेही प्रकार या शाळेतून समोर आले आहे. परिणामी, शिक्षणाच्या मंदिरातच मुली असुरक्षित असल्याची भावना मनात घर करत आहे. या संपूर्ण घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.