Dodamarg Elephant Attack  
गोवा

Dodamarg Elephant Attack | मृत्यूत आणि माझ्यात होते पाच फुटांचे अंतर; दोडामार्गात थरारक रात्रीचा अनुभ !

Dodamarg Elephant Attack | हुल्ला टीममधील सदस्याचा काळोख्या रात्रीतील थरारक अनुभव

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

जंगलातील त्या काळोख्या रात्री मी अगदी पाच फुटांवर उभा असलेला माझा मृत्यू पाहिला. मृत्यूच्या रूपाने भलामोठा गणेश टस्कर माझ्यासमोर उभा होता. पण, मी घाबरलो नाही, अथवा पळालो नाही. पळालो असतो, तर त्या अरुंद वाटेत त्याने मला गाठलेच असते, त्यामुळे मी त्याच्या समोरून न हलता माझ्या हातातील एक मशाल त्याच्या दिशेने फेकली. पण, तो थांबला नाही, म्हणून दुसरी फेकली, ती त्याच्या डोक्याला चाटून गेल्याने तो थांबला आणि परतला.

अंगावर काटे आणणारा हा थरारक अनुभव सांगत होता संदीप महातो. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांत सध्या सहा हत्तींचा वावर आहे. त्यांच्याकडून शेती बागायतींचे नुकसान केले जात आहे. या हत्तींना मानवी वस्तीपासून आणि शेती बागायतींपासून दूर ठेवण्याचे स्थानिक वनकर्मचारी व हाकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पश्चिम बंगालमधील प्रशिक्षित हाकाऱ्यांची एक हुल्ला टीम दोडामार्गात आली आहे.

या टीममधील एक सदस्य आहे संदीप महातो. या टीममध्ये चार सदस्य होते. एक सदस्य पश्चिम बंगालला परतला आहे, तर संदीप, सुरजो कांतो तुडू आणि हिरानी शिवणकर थांबले आहेत. आठ दिवस त्यांनी स्थानिक वनकर्मचारी व हाकारे यांना प्रत्यक्ष हत्तींचा वावर असलेल्या क्षेत्रात जाऊन प्रशिक्षण दिले आहे. याच दरम्यानचा रोमांचक अनुभव संदीपने दै. पुढारीशी बोलताना सांगितला. पणजी दोडामार्ग बेळगाव राज्यमार्गाशेजारील घाटीवडे बांबर्डे भागात सध्या हत्तींच्या कळपाचा वावर आहे.

बांबर्डेच्या जंगलात दिवसा हत्तींचा कळप राहतो आणि रात्री वस्ती आणि शेती बागायतीकडे येतो. त्यांना पुन्हा जंगलाकडे कसे परतवून लावायचे याचे प्रशिक्षण संदीप देत होता. वेळ रात्री एक दरम्यानची. वनअधिकारी, वनकर्मचारी, हाकारे त्यांच्या सोबत होते. मशाल आणि बॅटरीच्या उजेडात त्यांना कळप दिसला. कळप त्यांच्या दिशेनेच येत होता. कळपाचे नेतृत्व करत होता गणेश हत्ती.

तो आक्रमक असल्याने तो येतो कळल्यावर सगळे मागच्या मागे पळाले. केवळ संदीप एकटाच उरला. सगळे पळाल्याचे लक्षात येऊनही त्याने आपले तंत्र वापरण्याचे धाडस केले. तरीही मशालीला न घाबरता गणेश थेट अंगावर चाल करून आला. आता दोघांमध्ये अंतर होते ५ ते ७ फुटांचे. गणेशने सोंड लांबवली असती, तरी तो हत्तीच्या पकडीत आला असता. मात्र, प्रसंगावधान राखून त्याने मशाल त्याच्या दिशेने फेकली आणि गणेश परतला. हे कौशल्य शिकवण्यासाठी हुल्ला टीम दोडामार्गमध्ये आली आहे. सद्यस्थितीत ४ ते ५ जण चांगले प्रशिक्षित झाले आहेत.

गणेश येताना पुढे, जाताना मागे

कळपाच्या संरक्षणासाठी वस्तीकडे येताना गणेश पुढे असतो, तर जाताना मागे असतो. तसेच दिवसा इतर हत्ती झोपतात, तेव्हा एक हत्ती त्यांच्यापासून थोडा दूर थांबून पहारा देत असतो. बांबर्डेच्या जंगलात हे चित्र अनेकांनी पाहिले आहे. जेव्हा सगळेच दमलेले असतात आणि धोका नसतो, तेव्हा मात्र सगळेच झोपतात.

समजून घेतल्यास टळेल संघर्ष...

माणसाने हत्तींना समजून घेतले, त्याच्याशी सतत संवाद साधला तर हळूहळू हत्तींना माणसाची भाषा, त्याला काय सांगायचे आहे ते कळते. माणसानेही हत्तींना समजून घ्यायला हवे. जेव्हा दोघेही एकमेकांना समजून घेतील, तेव्हा हत्ती मानव संघर्ष उरणार नाही. गडचिरोलीमध्ये ३२ हत्तींना हुल्ला टीममधील पूर्वी ५, तर आता केवळ दोन सदस्य सांभाळत आहेत. त्यांच्यात सुसंवाद सुरू असून हत्ती त्यांचे ऐकतात, असे संदीप, सुरजो आणि हिरानी यांनी सांगितले. हिरानी हा गडचिरोली येथील असून तिघेही दीड वर्षे गडचिरोलीत काम करत आहेत

ओंकारला भेटायची इच्छा होती पण...

आम्ही दोडामार्गाला आलो तेव्हा ओंकारबद्दल खूप ऐकले, व्हिडिओही पाहिलेत. त्यामुळे त्याला भेटायची खूप इच्छा होती. मात्र, तो कळपात राहतो आणि गणेश त्या कळपाच्या नेहमी मागे पुढे असतो, असे संदीप म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT