डिचोली : पुढारी वृत्तसेवा
एका वर्षात साजऱ्या होणाऱ्या तीन राष्ट्रीय दिवसांना सर्व नगरसेवकांनी गांभीयनि व आदरभावनेने उपस्थित राहावे, यासाठी साखळी नगरपालिकेने ऐतिहासिक व ठराव घेतला आहे. सलग तीन राष्ट्रीय दिवसांचे सोहळे चुकविणाऱ्या नगरसेवकाचा एका महिन्याचा पगार कापला जाणार आहे.
तसा ठराव नगरपालिका मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राज्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन व १९ डिसेंबर हा गोवा मुक्तिदिन असे तीन राष्ट्रीय दिवस साजरे केले जातात.
नगरपालिकेतर्फे या दिवशी ध्वजारोहण होते. परंतु या राष्ट्रीय दिवसांना काही नगरसेवक दांडी मारतात. राष्ट्रीय दिनी सोहळ्यांना उपस्थित राहायलाच हवे, असा मुद्दा मांडत यापुढे जो नगरसेवक सलग राष्ट्रीय दिनाचे तीन सोहळे चुकवेल, त्याचा एक महिन्याचा पगार कापला जावा, असा ठराव नगराध्यक्षांनी मांडला.
यावेळी उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, प्रवीण ब्लेगन, रियाझ खान, रश्मी देसाई, निकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, श्रीपाद माजिक, अभियंता सुभाष म्हाळशेकर, धीरज नागवेकर, नारायण परब आदी उपस्थित होते.
भाडेपट्टीवरील खोल्या, फ्लॅटस्ना कचरा कर !
साखळी नगरपालिका क्षेत्रात खोल्या, फ्लॅटस्मध्ये भाडेपट्टीवर राहणारे लोक आपला कचरा बाहेर फेकतात. कारण त्यांच्याकडून कचरा कर व घरपट्टी स्वीकारली जात नसल्याने पालिकेचे सफाई कर्मचारीही त्यांच्या दारात जात नाही. यापुढे अशा भाडेपट्टीवरील सर्व खोल्या, फ्लॅटस् यांना कचरा कर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाडेपट्टीवर राहणारे लोक जवाबदारीने कचरा पालिका सफाई कामगारांकडे देतील व पालिकेला महसुलही मिळेल, असा ठराव घेण्यात आला.