पणजी : देशभरात तब्बल ४१७ रु. कोर्टीच्या मनी लाँडरिंग नेटवर्कचा पर्दाफाश करत गोव्याच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. 'डिजिटल अरेस्ट' आणि गुंतवणूक फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध खात्यांमध्ये वळवून त्याची अफरातफर केल्याचा आरोप या तिघांवर आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट भूषण सूर्यकांत मोये (४७), तसेच रोकड रूपांतरणाचे एजंट शैलेश दगडू चव्हाण (३८) आणि विलास नारायण पवार (६१) यांचा समावेश आहे.
तिन्ही आरोपींना मेरशी येथील उत्तर गोवा विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ईडीला तिन्ही आरोपींची १ सप्टेंबरपर्यंत कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत सुरू करण्यात आला. सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास हाती घेतला होता. या प्रकरणाची सुरुवात मडगाव येथील एका महिलेच्या तक्रारीतून झाली.
२१ मे ते २ जून २०२५ या कालावधीत आरोपींनी तिला विविध प्रकारे धमकावून आणि फसवून २.६० रु. कोटींपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या डेटाशी या खात्यांची पडताळणी केली असता, देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३३० पीडितांच्या तक्रारी आणि १६३ एफआयआर या नेटवर्कशी संबंधित असल्याचे आढळले.
नऊ खात्यांमध्ये रक्कम जमा
ईडीच्या आर्थिक तपासात फसवणुकीची रक्कम सुरुवातीला नऊ प्रमुख खात्यांमध्ये जमा झाल्याचे समोर आले. त्यानंतर ही रक्कम ४०० हून अधिक बनावट किंवा 'म्यूल' खात्यांमध्ये वेगाने वळवण्यात आली. एटीएममधून पैसे काढणे तसेच विविध यूपीआय गेटवेच्या माध्यमातून व्यवहार करून पैशांचा माग काढणे कठीण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपास पुढे या पैशांच्या व्यवहारांचा संबंध प्रवास, कमोडिटी आणि परकीय चलन व्यवहार करणाऱ्या विविध कंपन्यांशी असल्याचे आढळले. या नेटवर्कशी संबंधित बँक खात्यांमधून २७,८५० कोर्टीहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय जवळपास २,९०४ कोटींची रोकड जमा करण्यात आली.