पणजी : धारबांदोडा तालुक्यातील आगलोट-साकोर्डा येथील सातपाल मार्गालगतच्या पानस जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृत पट्टेरी वाघ आढळला. मृत वाघाचे दात आणि नखे गायब असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने वाघाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि तटस्थपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.
खासगी वनक्षेत्र असलेल्या साकोर्डा भागात दुर्गंधी येत असल्याने पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी पुढे जाऊन पाहिले असता त्यांना मृत वाघ दिसला. त्यानंतर तत्काळ वन खात्याला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघ पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने केवळ अवशेष उरले होते. या घटनेबाबत पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
२००९ ते २०१९ या कालावधीत राज्यात पाच वाघ मृतावस्थेत सापडले होते. आता २ मे २०२६ रोजी पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. सरकार मूकबधिर झाले आहे. त्यामुळे आता आम्ही कोणाच्या नावाने रडावे, असे विचारून केरकर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे, असे म्हटले आहे.
आम्ही कोणाच्या नावाने रडावे?
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, एकीकडे सरकारी यंत्रणा गोव्यात वाघच नसल्याचे सांगते, तर दुसरीकडे वारंवार वाघाचे अस्तित्व ठळक होत आहे.
उपवनसंरक्षकांचा नैसर्गिक मृत्यूचा दावा
वाघाच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक अंदाजानुसार काही संशयास्पद वाटत नाही, तर त्याचा मृत्यू नैसर्गिक असावा अशी माहिती उपवनसंरक्षक जी. वर्गीस यांनी दिली. पशुवैद्यकीय अधिकारी आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मृतदेह अतिशय कुजलेला असल्याने शवविच्छेदन करणे कठीण आहे. मात्र, फॉरेन्सिक चाचणी करण्यात येईल, मृतदेह सडल्यामुळे दात नखे गळली असू शकतात, असेही वर्गीस यांनी सांगितले.