

Goa Dharbandora Tiger Poaching
पणजी : धारबांदोडा येथील जंगल परिसरात एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वाघाचे दात आणि नखे गायब असल्याने त्याची शिकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात सापडलेले कलेवर काही दिवसांपूर्वीचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. वाघाच्या अवयवांचा अभाव लक्षात घेता हा प्रकार नैसर्गिक मृत्यू नसून शिकारीशी संबंधित असण्याची शक्यता अधिक असल्याचे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी २०२० साली सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य परिसरात चार वाघांना विष देऊन ठार मारण्यात आले होते. या घटनेत दोन बछड्यांचाही समावेश होता, ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.
दरम्यान, राज्यात वाघ अस्तित्वात नसल्याचा दावा करणाऱ्या गोवा सरकारच्या भूमिकेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबतचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
या पार्श्वभूमीवर, या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केली आहे.