पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा गोवा भाजपकडून निषेध करण्यात आला. पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला.
कदंब पठारावरील प्लुटो येथील भाजपाच्या अटल भवन मुख्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुकळ्येकर आणि सर्वानंद भगत उपस्थित होते.
नाईक म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील मतदारांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी दिली. मोदी यांनी केलेल्या विकासकामामुळेच जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेसचे नेते दर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करतात. त्यांच्या आई-वडिलांबद्दलही अपमानास्पद भाषा वापरली जाते. जनतेला ही बाब आवडत नसल्याने काँग्रेसला निवडणुकींमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. त्यानंतर काँग्रेस विविध कारणे देत आंदोलने करते, असा आरोप नाईक यांनी केला. पंतप्रधानांचा अपमान भाजपाचे कार्यकर्ते सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गोव्यात काँग्रेसने काढलेली पदयात्रा ही 'गोवा राखण यात्रा' नसून 'काँग्रेस रक्षण यात्रा' होती, अशी टीका नाईक यांनी केली. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत भाजप मजबूत असून, गरज पडल्यास पक्ष सर्व मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो, असे त्यांनी म्हटले. मात्र, आगामी निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत भाजपची युती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
खर्गे हे ज्येष्ठ राजकारणी असून त्यांच्या पक्षात त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांनी पंतप्रधानांप्रतीही आदर राखला पाहिजे, असे सावंत यांनी सांगितले. राजकीय नेत्यांनी टीका करताना व्यक्तिगत हल्ले करण्याची पातळी गाठणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.