गोवा

Mirabag Dam Protest | कुडचडेतील व्यापाऱ्यांचा मीराबागवासीयांना पाठिंबा

Mirabag Dam Protest | प्रतीकात्मक बंद; आंदोलनाची दखल घेत नसल्याने सरकारवर नाराजी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सावर्डे येथील मीराबाग परिसरात जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या आंदोलनाला आता कुडचडे बाजारातील व्यापाऱ्यांचाही ठाम पाठिंबा मिळू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर कुडचडे बाजारातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी १२ ते १ या वेळेत प्रतीकात्मक बंद पाळून मीराबाग येथील आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. गरज भासल्यास एक दिवस संपूर्ण बाजार बंद ठेवण्यासही आम्ही तयार आहोत, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला. मीराबाग येथे गेल्या पंचवीस दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ बंधाऱ्याविरोधात धरणे आंदोलन करत आहेत.

या प्रकल्पामुळे जुवारी नदीचे नैसर्गिक स्वरूप तसेच परिसरातील पर्यावरण धोक्यात येईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मात्र सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कुडचडे बाजार समितीचे अध्यक्ष रोशा परेरा यांनी सांगितले की, मीराबाग येथील नागरिकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे व्यापाऱ्यांनी एक तास दुकाने बंद ठेवून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रतीकात्मक बंद यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

'सरकार तुमच्या दारी' अशी घोषणा दिली जात असली, तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनाच सरकारच्या दारात जावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पांमुळे देवस्थाने, पर्यावरण तसेच गावांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत सरकारने मीराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कुडचडेत अनेक जेटींना मान्यता

प्रदीप काकोडकर यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. कुडचडे परिसरातील नागरिकांना नको असलेले प्रकल्प या भागात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. जुवारी नदीवर बंधारा उभारल्यास नदीचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मीराबाग येथे बंधाऱ्याविरोधात आंदोलन सुरू असताना कुडचडे परिसरात प्रस्तावित जेटींविरोधातही नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले. कुडचडे परिसरात अनेक जेटींना मान्यता देण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT