

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
चर्चिल आलेमाव राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या प्रकरणांवरून माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली र आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगातही अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यामुळे राज्यातील अमली पदार्थांच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न 1 ड न आलेमाव यांनी सांगितले की, लुईस बर्जर प्रकरणात ते कोलवाळ तुरुंगात असताना तेथे अमली पदार्थ सहज मिळत असल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी त्यावेळी विधानसभेच्या अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते.
मात्र, त्यावेळी सरकारने ठोस कारवाई केली असती, तर आज अमली पदार्थांच्या व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य झाले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या गोव्यात जवळपास दररोज अमली पदार्थांची प्रकरणे उघडकीस येत आहेत. मात्र, हे अमली पदार्थ नेमके कोणासाठी आणि कोणाच्या माध्यमातून राज्यात आणले जातात, याचा अद्याप उलगडा झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील अमली पदार्थांचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अमली पदार्थांची ही कीड आता थेट शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचल्याचा इशाराही त्यांनी दिला.
तरुण पिढी या विळख्यात अडकत असून त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर संपूर्ण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यावेळीही शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत अमली पदार्थ पोहोचू नयेत यासाठी शिक्षण संस्थांवर विशेष लक्ष ठेवण्याची मागणी आपण केली होती, असे ते म्हणाले. सरकारने अधिक वेळ न दवडता शिक्षण संस्थांमध्ये आणि त्यांच्या परिसरात अमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
बर्जर प्रकरणात विनाकारण नाव
लुईस बर्जर लाच प्रकरणात मला विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले होते. त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नव्हता. लुईस बर्जरला मी कधीच भेटलो नव्हतो. मात्र, विनाकारण मला या प्रकरणाशी जोडले गेले. या प्रकरणातील खरे आरोपी नंतर त्याच मंत्रिमंडळात आमदार झाले आणि आता ते सुशेगाद जीवन जगत आहेत, असा आरोपही आलेमाव यांनी यावेळी केला.