गोवा

गोवा : सराईत गुन्हेगार प्रकाश पाटील याचा खून झाल्याचा संशय

दिनेश चोरगे

पणजी : झरीवाडा-पोडोशे, सत्तरी येथील कुख्यात गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करुन त्याचा भाऊ प्रशांत पाटील याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. डिचोली पोलिस तक्रार घेत नसल्याने त्याने २७ मार्चला उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. यात त्याने डिचोली पोलिसांना भाऊ प्रकाश पाटील बेपत्ता असून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

प्रकाश पाटील हा गेल्या तीन महिन्यांपासून साळ-डिचोली येथून बेपत्ता आहे. पत्नी मंजुळा पाटील उर्फ वडार व तिच्या माहेरच्या मंडळींनी त्याचा खून केला असून या प्रकरणी तपास करावा, अशी मागणी प्रकाशने केली आहे. घटनेच्या दिवशी २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी प्रकाश हा पोडोशे येथील घरी आला होता. आपल्या आईला मेहूणा नागेश वडार याच्याकडून उसने घेतलेले ८ लाख रूपये घ्यायला तसेच मंजुळाच्या नावे असलेली घरपट्टी आपल्या नावे स्थानिक पंचायतीकडून हस्तांतरित करतो, असे सांगून तो निघून गेला होता. प्रकाश २९ डिसेंबर रोजी तो साळ-डिचोली येथे मंजुळाच्या भावाकडून पैसे आणण्यासाठी गेला होता. तिथे त्याचे मंजुळा व तिच्या कुटुंबीयांशी भांडण झाले होते. ही माहिती लगेच आईने मला दिली होती, तसेच प्रकाशचा संपर्क होत नसल्याची माहिती २५ जानेवारी २०२४ रोजी मला आईने फोनद्वारे दिली होती. असेही प्रशांतने म्हटले आहे.

दरम्यान, २१ फेब्रुवारीला प्रशांत गोव्यात आला होता. मंजुळाकडे त्याने प्रकाशची विचारपूस केली. तेव्हा २९ डिसेंबर रोजी आमच्यामध्ये भांडण झाले असल्याचे तिने सांगितले. पण, तिने या भांडणात समावेश असलेल्या कुटुंबियांची नावे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी मंजुळाला प्रकाश बेपत्ता झाल्याची तक्रार डिचोली पोलिसांत नोंदवण्यास भाग पाडले. त्याने २४ जानेवारी रोजी डिचोली पोलिसांची भेट घेतली पण तक्रार नोंदवून घेतली नाही, असेही प्रकाशने तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, प्रकाश २९ डिसेंबरला मंजुळा हिच्या घरी गेल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत दोडामार्ग (सिंधुदुर्ग ) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रशांतला मंजुळा व कुटुंबियांचा संशय आल्याने फिर्यादी प्रशांत पाटील हे अलीकडे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गेले व चौकशी केली. तेव्हा प्रकाशला त्या रुग्णालयात २९ डिसेंबर रोजी दाखल केले होते. त्याच्या डोक्याला मोठा मार लागला होता आणि तो रक्ताच्या उलट्या करत होता. शिवाय मंजुळाही तिथे उपचारार्थ दाखल झाली होती. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या
रुग्णालयत नेण्यास सांगितले. पण मंजुळा व तिच्या कुटुंबियांनी प्रकाशला म्हापशाला नेले नाही. धारदार हत्यारांनी केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर दुखापत होऊन भाऊ प्रकाशचा मृत्यू झाला असावा आणि खुनाचा आरोप होऊ नये, म्हणून मंजुळा व तिच्या कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, असा संशय प्रशांतने या तक्रारीत व्यक्त केला आहे.

प्रकाशची तीन लग्ने

प्रकाशने पहिल्यादा राधाशी, नंतर मंजुळाशी आणि नंतर कणकवली सिंधुदुर्ग येथील सुप्रिया नामक महिलेशी तिसरे कथित लग्न केले होते .प्रकाश २ किंवा ३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील कोठडीतून सुटला होता. त्याला घ्यायला मंजुळा व त्याची तिसरी पत्नी सुप्रिया गेली होती.

कसई दोडामार्गात मालमत्ता

प्रकाश याने कसई, दोडामार्ग येथील एका मालमत्तेत १६ लाखांची गुंतवणूक केली होती. त्या मालमत्तेचे विक्रीपत्र मंजुळा स्वतःच्या नावावर करण्यासाठी भांडत होती. शेवटी तिने ते २४ जानेवारीला आपल्या नावावर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मणेरीत फार्म हाऊस

प्रकाश पाटील याचे मणेरी (दोडामार्ग -सिंधुदुर्ग ) येथे फार्म हाऊस आहे. त्याचे काम मंजुळाचा भाऊ नागेश याने केले होते. त्यात त्याने प्रकाशकडून अधिक रक्कम घेतल्याचे प्रशांत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT