देवरी तालुक्यातील आदर्श आमगाव येथील जंगलात विविध प्रजातीचे मौल्यवान वृक्ष असून बिबट, हरीण, काळविट, अस्वल आदी अनेक वन्यप्राणी आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास या जंगलात वणवा पेटल्याची माहिती वनविभाग देवरीला मिळाली. त्यानंतर देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाडाच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, जोराचा वारा वाहत असल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. तथापि, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्लोअरची मदत घेण्यात आली, तब्बल सहा तासांत या वणव्यावर नियंत्रण मिळविता आले. जंगलात आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण कळू शकले नाही. मात्र, या वणव्यात अंदाजे ८ – १० एकरातील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे.