म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर झालेल्या भीषण अपघातात माजी पंच सदस्य मायकल फर्नाडिस यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी चिखली-कोलवाळ चाररस्ता जंक्शनवर प्रलंबित असलेला पादचारी भुयारी मार्ग तातडीने उभारण्याची मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेनंतर चर्च सभागृहात झालेल्या बैठकीस सुमारे ७० ग्रामस्थ उपस्थित होते. सेंट अँथनी चॅपेलजवळ पादचारी भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाच्या रुंदीकरणामुळे कोलवाळ गावाचे दोन भाग झाले असून दैनंदिन कामांसाठी महामार्ग ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर ग्रामस्थांना चर्च, बाजारपेठ, आरोग्य केंद्र, पंचायत कार्यालय तसेच इतर अत्यावश्यक सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. या प्रश्नाचा पाठपुरावा, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करण्यासाठी ग्रामसभेत विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू : सरपंच
सरपंच रितेश वारखंडकर यांनी सांगितले की, भुयारी मार्गाच्या मागणीबाबत सार्वजनिक बांधकाम खाते आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक आमदार नीळकंठ हळर्णकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाही पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे.