CM pramod Sawant 
गोवा

Goa 2036 Olympic Preparation | आतापासूनच करा ऑलिम्पिकची तयारी! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोमंतकीय खेळाडूंना आवाहन

Goa 2036 Olympic Preparation | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : कौशल्य योजनेतून उन्नती साधण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील उच्च शिक्षितांसोबतच आठवी उत्तीर्ण, दहावी नापास विद्यार्थ्यांच्या भवितव्याचीही सरकारला तितकीच काळजी आहे. त्यांच्यासाठी तीन महिन्यांचा दीनदयाळ मुख्यमंत्री कौशल्य योजना अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून युवकांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

दरम्यान, गोमंतकीय खेळाडूंनी आतापासून २०३६ ऑलिम्पिकसाठी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. साखळीतील ईगल स्पोर्टस् क्लबच्या नवीन कार्यालय व वाचनालयाचे उ‌द्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, प्रवीण ब्लेगन, नगरसेविका दीपा जल्मी, रियाझ खान तसेच ईगल स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष प्रशांत फातर्फेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देतानाच २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी आजपासून तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्या पिढीला पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देणे गरजेचे असून, खेळाडूंना फॉर्म-४ प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे त्यांना क्रीडा कोट्यातून सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.

कौशल्य व सामाजिक शिक्षणाच्या माध्यमातून सर्वगुणसंपन्न पिढी घडविण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, साखळी शहरातील विकासकामे सध्या ८० टक्के पूर्ण झाली असून, येत्या सहा महिन्यांत शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल.

सुपाचीपुड ते इस्पितळापर्यंतचा रस्ता, बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण, दत्तवाडी पुलापर्यंत रस्त्याचा विस्तार, बाजारातील ऐतिहासिक किल्ल्याचे उद्घाटन तसेच वाळवंटी नदीचे सुशोभीकरण ही सर्व कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते मोकळे ठेवा...

बाजारातील दुकानदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवण्याऐवजी रस्ते मोकळे ठेवल्यास बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल आणि व्यापारालाही चालना मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. आठवडी बाजार सोमवारऐवजी रविवारी भरविण्याचा विचार करण्याची गरज असून, यासाठी व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ईगल स्पोर्टस् क्लबने साखळीतील क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. पुढील काळात साखळीत क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचे क्लबचे अध्यक्ष प्रशांत फातर्फेकर यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फीत कापून, कोनशिला अनावरण, श्रीफळ वाढवून व समई प्रज्वलित करण्यात आले. सूत्रसंचालन अमोल बेतकीकर यांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

सौरऊर्जा मिशनमध्ये सहभागी व्हा नगराध्यक्षा

ईगल स्पोर्टस् क्लब हा साखळीतील अत्यंत जुना व कार्यरत क्लब असल्याने त्याला कार्यालय उपलब्ध करून देणे नगरपालिकेचे कर्तव्य होते. साखळी नगरपालिकेच्या सौरऊर्जा मिशनमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवाव्यात. अवघ्या ३० हजार रुपयांच्या खर्चात शून्य वीजबिल शक्य असल्याचे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT