सांगे : समाजकल्याण खात्याच्या माध्यमातून मंत्री सुभाष फळदेसाई यांनी योग्य न्याय देण्याचे काम केले असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाजकल्याण योजनांचा लाभपोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री फळदेसाई यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केले. पाण्याच्या प्रश्नासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार म्हणूनही त्यांनी फळदेसाईंचे कौतुक केले. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी मानवी दृष्टिकोनातून ते काम करीत असल्याचे सांगत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले. फळदेसाई यांचे कार्य असेच सुरू राहावे, असा आशीर्वादही त्यांनी दिला.
गोव्याच्या राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू व धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सांगे मतदारसंघाचे आमदार तथा समाजकल्याण, पेयजल, दिव्यांग सक्षमीकरण आणि नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांचा ६० वा वाढदिवस सांगे नगरपालिका सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
वाढदिवसानिमित्त सकाळी ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर फळदेसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सांगे भाजप मंडळ आणि जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी सहभाग घेतला. यानंतर सभागृहात उपस्थित राहून त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दिगंबर कामत, सभापती गणेश गावकर, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार एल्डन डिकॉस्टा, आमदार नीलेश काब्राल, उपसभापती जोशुआ डिसोझा, माजी आमदार प्रवीण झांट्ये, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री माविन गुदिन्हो, माजी मंत्री प्रकाश वेळीप, अॅड. कुणाल, कुशावती जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर, आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, आमदार केदार नाईक, मंत्री रमेश तवडकर, दाजी साळकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, आमदार दिगंबर कामत, आमदार डिलायला लोबो, आमदार राजेश फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेट्ये, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री रमेश तवडकर यांनी सुभाष फळदेसाई यांच्या धडाडीच्या आणि सेवाभावी स्वभावामुळे सांगेच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगितले. राजकारणातील अभ्यासू आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून जनता त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले. दाजी साळकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे आणि संकटाच्या वेळी धावून येणारे आमदार म्हणून फळदेसाई यांची ओळख असल्याचे सांगितले. आमदार केदार नाईक यांनी फळदेसाई हे सामान्यांशी जोडलेले आणि लोकप्रिय आमदार असून, अनुभवाच्या जोरावर व जिद्दीने ते विकासकामे करीत असल्याचे सांगितले. २०२७च्या विधानसभा निवडणुकीत गोव्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सर्वांच्या आशीर्वादाने पुढे जाणार : फळदेसाई
यावेळी सुभाष फळदेसाई यांनी वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले. सगळ्यांचे प्रेम आणि शुभेच्छा मला मिळाले. आता मला भीती नाही. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढे जाणार, असे सांगितले.