Tiger Attack 
गोवा

Tiger Attack | चिमूर तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू

Tiger Attack | मृत शेतकऱ्याचे नाव शेषराव नत्थू झाडे (वय ५२, रा. कवडशी) असे असून ही घटना समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघहल्ल्याची भीषण घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी परिसरात सोमवारी रात्री एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघड झाले. मृत शेतकऱ्याचे नाव शेषराव नत्थू झाडे (वय ५२, रा. कवडशी) असे असून ही घटना समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

सोमवारी सायंकाळी शेषराव झाडे हे शंकरपूर येथे बाजार हाट करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नव्हता.

मंगळवारी सायंकाळी शंकरपूर–कवडशी रस्त्यालगत एमएसईबी कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा वरचा भाग वाघाने खाल्लेल्या अवस्थेत असल्याचे आढळल्याने हा वाघाचा हल्ला असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी ताबडतोब ही माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासातून मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याची पुष्टी मिळाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. गेल्या काही महिन्यांत येथे मानव–वन्यजीव संघर्षाची प्रकरणे चिंताजनक प्रमाणात वाढली आहेत. जिल्ह्यातील वाघहल्ल्यांमधील मृतांची संख्या आता ४० वर पोहोचल्याने शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांमध्ये घबराट आहे.

ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी सांगतात की, जंगलालगतच्या शेती पट्ट्यांमध्ये वाघ, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. दैनंदिन शेतीकाम, पाण्याची सोय, जनावरांना चारापाणी करण्यासाठी बाहेर जाताना भीती सतत जाणवत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी संघटना दीर्घकाळापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षा भिंती, सतत गस्त, तसेच योग्य व वेळेत मिळणाऱ्या नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. तरीही हल्ल्यांची मालिका थांबत नसल्याने असंतोष वाढत आहे.

या घटनेनंतर वनविभागाने कवडशी परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांना अंधारात एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वन अधिकाऱ्यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पथक नियुक्त केले आहे.

दरम्यान, गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वाढत्या वन्यप्राणी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. जंगलक्षेत्र लागून असलेल्या गावांमध्ये सुरक्षा उपायांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर संपूर्ण चिमूर तालुका आणि परिसरातील गावात भीतीचे सावट पसरले असून नागरिक सतर्क आहेत. वनविभागही पुढील घटना टाळण्यासाठी सतर्कतेने कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT