

नायगाव : गोदावरीचे पात्र काळोखात शांत असले तरी त्याच अंधारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा धंदा चालू होता. पण सोमवारी मध्यरात्री मंगळवारी पहाटे प्रशासनाने अचानक ‘हल्ला’ चढवत वाळू माफियाच्या छाताडावरच घाव घातला. मौजे बरबडा येथे रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू असलेला अवैध वाळू उपसा ‘इन अॅक्शन’ पकडत प्रशासनाने दोन प्रचंड बोटी व एक इंजिन ताब्यात घेतले आणि पहाटे तीनच्या सुमारास जिलेटीनने उडवून पूर्ण नष्ट केले.
तब्बल ३३ लाखांच्या अवैध बोटी व इंजिनाचा धुडकाव प्रशासनाच्या या तडाख्यामुळे माफियांमध्ये अक्षरशः धडकी भरली आहे. तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी ‘पुढारी’शी बोलताना ही माहिती दिली
रात्रीचा कमांडो-स्टाईल ऑपरेशन!
अवैध वाळू उपसा सुरू असल्याची पक्की खबर मिळताच उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच पथक तयार करण्यात आले. अंधारात नदीपात्रात धाड टाकतानाच अवैध बोटी व इंजिन दिसताच अधिकारी सरळ पाण्यात उतरले. बोटी सील करून पहाटे जिलेटीनच्या सहाय्याने त्या उडवून खाक करण्यात आल्या. पाण्यावर तरंगणारे लोखंड क्षणात हवेत विरले… आणि बरबड्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा दम ठोकून दिला
धडक कारवाईत ‘ही’ टीम होती हजर
या कारवाईत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,यांच्या मार्गदर्शना खाली, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, मंडळ अधिकारी अरविंद कावळे, रोहित पवार, सचिन आरु, ग्राम महसूल अधिकारी श्याम मुंडे, सुनिल हसनपल्ले, शुभम पाटील, संदीप पवार, परमेश्वर कार्लेकर, चंद्रमय कदम, जयंत तुडमे, गजानन देशमुख, गोविंद काळे, ड्रायव्हर तुकाराम पुरी, कोतवाल अनिल जाधव, बापुराव तिजारे, शंकर खनपटे, बालाप्रसाद बिस्मिल्ले , कुंटूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल भोसले साहेब त्यांची कर्मचारी अशी मजबूत टीम उपस्थित होती.
वाळू माफियाची झोप उडाली!
अवैध वाळू उपसासाठी वापरली जाणारी महागडी यंत्रणा क्षणात उडवून नष्ट केल्याने वाळू माफियामध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. नदीकाठच्या गावांत एका रात्रीत केलेल्या या धडक कारवाईची चर्चा तुफान रंगली आहे. प्रशासन आता या साखळीतील मोठ्या माशांवरही कारवाई करण्यास सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.