Erosion of Goa coasts
गोव्यातील किनार्‍यांची घट होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. Pudhari News Network
गोवा

Goa Coasts | सावधान ! गोव्यातील किनार्‍यांची होतेय घट

पुढारी वृत्तसेवा
दीपक जाधव

पणजी : गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. गोव्यातील किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. गोव्याच्या पर्यटन व्यवसायात समुद्र किनार्‍यांचा मोठा वाटा आहे. मात्र, गोव्यातील किनार्‍यांची घट होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याचा भविष्यात पर्यटन व्यावसायावर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. (Goa Coasts)

26.82 किमी किनारपट्टीची धूप झाली

1990 ते 2018 या 28 वर्षांत गोव्यातील 19.2 टक्के म्हणजेच एकूण 139.64 किमीपैकी 26.82 किमी किनारपट्टीची धूप झाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभा अधिवेशनात दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती दिली. याविषयी दक्षिण गोव्याचे खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. (Goa Coasts)

सागरी किनार्‍यांच्या अभ्यासातून माहिती उघड

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्राने देशभरात (एनसीसीआर) 1990 ते 2018 दरम्यान किनार्‍यांच्या होणार्‍या धूपप्रक्रियेचा अभ्यास केला होता. संस्थेने गोव्याच्या 139.64 किमी सागरी किनार्‍याचा अभ्यास केला होता. वरील कालावधीत उत्तर गोव्यातील 36.4 किमीपैकी 6.66 किमी म्हणजेच 18.3 टक्के समुद्र किनार्‍याची धूप झाली आहे. दक्षिण गोव्यातील 103.24 किमी किनार्‍यांपैकी 20.16 किमी म्हणजेच 19.5 टक्के किनार्‍याची धूप झाली आहे. (Goa Coasts)

विविध कारणांमुळे किनार्‍यांची धूप

गोव्यात विविध कारणांमुळे किनार्‍यांची धूप होत आहे. तसेच धूप भरून निघत असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. 1990 ते 2018 दरम्यान राज्यातील 19.1 किमी म्हणजेच 13.7 टक्के किनार्‍यावर पुन्हा वाळू भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यामध्ये उत्तर गोव्यातील 12 किमी (33 टक्के) आणि दक्षिण गोव्यातील 7.1 किमी (6.9 टक्के) किनार्‍यांवर वाळू भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, असेही या उत्तरातून स्पष्ट करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT