पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे-नागोवा पंचायतचे बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांना बर्च नाईट क्लब आगीच्या घटनेप्रकरणी म्हापसा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता लवकरच जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली.
हणजूण पोलिसांनी संशयित रघुवीर बागकर याची पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी आज न्यायालयात आणले होते. दोन दिवसांची कोठडी वाढवून देण्याची विनंती पोलिसांनी केली त्याला बागकर याच्या वकिलांनी विरोध केला.
गेले १२ दिवस तो पोलिस कोठडीत असून चौकशीवेळी तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे आणखी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी बाजू मांडली. न्यायालयाने सरकारी व संशयिताच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर रघुवीर बागकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, पंचायतीचे अपात्र सरपंच रोशन रेडकर याची पोलिस कोठडीतील चौकशी सुरू आहे. सत्र व उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो न्यायालयात शरण आला होता. न्यायालयाने त्याला हणजूण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेव्हापासून तो पोलिस कोठडीत आहे.
आज त्याला न्यायालयाने आणखी ६ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. संशयित लुथरा बंधूंच्या जामिनावरील निर्णय येत्या ५ फेब्रुवारीला ठेवण्यात आला आहे. हडफडे नाईट क्लब अग्निकांडप्रकरणी लुथरा बंधूंसह क्लबचा मुख्य सरव्यवस्थापक तसेच व्यवसाय भागिदार अजय गुप्ता हे न्यायालयीन कोठडीत आहेत. क्लबच्या जमिनीचा मूळ मालक सुरिंदर खोसला सध्या फरारी आहे.