पणजी : पुढारी वृत्तसेवा
बर्च बाय रोमिओ लेन क्लबला लागलेल्या आग प्रकरणाची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिका (सुमोटो) दाखल करून घेत दखल घेतली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाला आवश्यक माहिती देण्यासाठी अॅड. रोहित ब्रास डिसा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नेमणूक केली आहे. या याचिकेवर ८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.
बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामे ही या समस्येचे मूळ असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविताना न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. व्यावसायिक बांधकामे व ती पाडण्यासाठी दिलेल्या स्थगितीचा विषय आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
बर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या जमिनीसंबंधी प्रदीप घाडी आमोणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी व्यावसायिक बांधकामांना दिलेल्या स्थगितीवरसुद्धा चर्चा झाली. बेकायदा बांधकामे व त्यांच्या परिणामांविषयी उच्च न्यायालयाने चिता व्यक्त केली आहे. त्यासाठी न्यायालयाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे.
बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी आग लागून २५ जण मृत्यू पावले होते. या दुर्घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. दंडाधिकाऱ्यांनी जमिनीच्या कागदपत्रांसंबंधी प्रदीप घाडी आमोणकर, सुनील दिवकर या दोघांची चौकशी केली आहे. चौकशी सुरू असताना प्रदीप घाडी आमोणकर यांनी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली.
या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. राज्यात व्यावसायिक बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटनेनंतर सरकारने समिती स्थापन करून क्लब, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांच्या परवान्यांची तपासणी सुरू केली आहे.
परवाने नसलेल्या दियाज (हणजूण), सीओ २, गोया (दोन्ही वागातोर) या क्लबना सील ठोकण्यात आले. पंचायतीने पाडण्याचे आदेश देऊनही पंचायत संचालनालयाने आदेशाला स्थगिती दिल्याने कारवाई होऊ शकली नाही. सुनावणीच्या वेळी हा विषय चर्चेला आला आणि उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली.
चौकशी समितीला मुदतवाढ
हडफडे येथील बर्च क्लबला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिता स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा आठवड्यात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ही चौकशी अपूर्ण असल्याने दंडाधिकारी समितीला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणातील अधिकारी, सरपंच व जमीन मालकांची चौकशी करुन त्यानंतर अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे चौकशी समितीने मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार ती मिळाली असल्याची माहिती दंडाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अंकित यादव यांनी सांगितले.
कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कुचराई
बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. मात्र, अशा बांधकामांना परवाने देताना तसेच कारवाई करण्यात अधिकाऱ्यांनी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांनी कुचराई केल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. अशा प्रकरणांमध्ये अंतिम जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्यासाठी न्यायालयाने विशिष्ट कायदेशीर तरतुदी ओळखण्याचे आणि निश्चित करण्याचे आदेश दिले असून याप्रकरणी म्हणणे मांडण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
लुथरा बंधूंना उद्या आणणार भारतात
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी या क्लबच्या मालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील फरार मालक सौरभलुथरा व गौरव लुथरा यांना बुधवारी गोव्यात आणले जाण्याची शक्यता आहे. लुथरा बंधूंना प्रथम दिल्लीत आणले जाईल. मंगळवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळवून त्यांना पुढील तपासासाठी बुधवारी गोव्यात आणण्यात येणार आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचे पथक थायलंडमधील फुकेत येथे गेले होते. भारत सरकारने त्यांचे भारतीय पासपोर्ट निलंबित केल्याने थायलंडमधील भारतीय दूतावासाने त्यांना इमर्जन्सी सर्टिफिकेटस् (एकतर्फी प्रवास कागदपत्रे) जारी केली असून, त्याद्वारे त्यांना भारतात आणले जाणार आहे.
मंत्री राणे राज्यात नाईट क्लबमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे राज्याची बदनामी होत आहे. त्यामुळे गोव्यात नाईट लाईफ रात्री १२ नंतर असू नये, अशी भूमिका आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतली आहे. गोव्याची संस्कृती जतन करताना राज्यातील युवकांना व्यसनांपासून मुक्त ठेवणे गरजेचे आहे. गोव्याला आध्यात्मिक पर्यटकाचे केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी विश्वजित राणे प्रयत्न करूया, असेही मंत्री राणे म्हणाले. दरम्यान, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सावियो रॉड्रिग्ज यांनीही राज्यात नाईट क्लब नकोच, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारी रावकीय नेत्यांनाही आता गोव्याची बदनामी करणारे नाईट क्लब नको झाले आहेतरात्री १२ नंतर नाईट लाईफ नको :