

पणजी : गोवा ते दिल्ली इंडिगोच्या विमानाने उड्डाणानंतर सुमारे 30 हजार फूट उंचीवर पोहोचल्यानंतर एका महिला प्रवाशाची नाडी क्षीण झाली. त्यामुळे तिचा जीव धोक्यात आला. आकाशातच सुरू झालेल्या या जीवन-मरणाच्या संघर्षात काँग्रेसच्या गोवा प्रभारी व ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली निंबाळकर या तिच्यासाठी देवदूत ठरल्या. कोणतीही अत्याधुनिक वैद्यकीय साधने उपलब्ध नसतानाही प्रसंगावधान, अनुभवाच्या जोरावर डॉ. निंबाळकर यांनी त्या प्रवाशाचा जीव वाचवला.
गोवा ते दिल्ली जाणार्या इंडिगो फ्लाईट 62091 मध्ये हवेतच वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, डॉ. अंजली निंबाळकर यांनी वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे 34 वर्षीय महिलेचे प्राण वाचले. डॉ. निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार, विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच ती प्रवासी बेशुद्ध पडली. तिची नाडी मंद होती, हात-पाय थंड पडले होते आणि ती प्रतिसाद देत नव्हती. आयव्ही लाईन किंवा प्रगत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसताना, मी तातडीने जीव वाचवण्याचे उपाय सुरू केले. ज्यात जागेवरच सीपीआर देणे, सतत निरीक्षण करणे आणि इलेक्ट्रोलाईटस्सह तोंडावाटे पुनर्जलीकरण करणे यांचा समावेश होता.
दिल्लीत प्राधान्याने विमान उतरल्यानंतर, डॉ. निंबाळकर यांनी आधीच सुचवल्यानुसार धावपट्टीवर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातून रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
हा भावनिक योगायोग...
डॉ. निंबाळकर यांनी प्राण वाचवलेल्या जेनी या कॅलिफोर्नियाच्या रहिवासी आहेत. त्यांची सासूसुद्धा स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्या दिल्लीत राहतात. जेनी यांनी डॉ. निंबाळकर यांचे मनोमन आभार मानले आणि या घटनेला एक भावनिक योगायोग म्हटले.