पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाच्या राज्य आणि केंद्र सरकारने चांगले काम केले आहे आणि करत आहे. भाजपची पक्ष संघटना मजबूत असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला.
पणजी येथे शुक्रवारी भाजपच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी हे विधान केले.
ते म्हणाले की, आपण पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी काम करत आहे. भाजपची पक्षघटना मजबूत आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपच्या मागे आहे.
महिलांचा पाठिंबा भाजपला आहे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेला विकास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे राणे यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेसच्या गोवा राखन यात्रेचा भाजपच्या मतदानावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे राणे एका प्रश्नावर बोलताना नमूद केले.
बांबोळी येथे बांधण्यात येत असलेल्या कॅन्सर इस्पितळाचे काम पूर्णत्वाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इस्पितळाचे उद्घाटन व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे राणे यांनी सांगितले.
त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी कॅन्सर इस्पितळाच्या बांधकामांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले. आपण पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार राज्यभर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 'आंगण की सेवा' हा महिलांसाठीचा उपक्रम राबवला जात आहे. साळगाव आणि कलंगुट येथे या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर आपला भर असून त्यासाठीच आपण लोकांमध्ये मिसळत असल्याचे राणे म्हणाले. येत्या काही दिवसांमध्ये गोव्यात आणखी ४० रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जातील. सध्या १०८ रुग्णवाहिकांचे ऑडिट सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.