गोवा

Birds Map Collection : गोव्यात साकारणार पक्षांचा नकाशासंग्रह; २२ पर्यावरण संस्थांची घोषणा

अमृता चौगुले

पणजी; पुढारी वृत्तसेवा : लवकरच गोव्यातील पक्ष्यांची माहिती देणारा नकाशासंग्रह (ॲटलास) येणार आहे. मंगळवारी विविध 22 पर्यावरण संस्थांनी एकत्र येत ही घोषणा केली. असा नकाशासंग्रह करणारे गोवा हे केरळ नंतर भारतातील दुसरे राज्य ठरले आहे. या नकाशा संग्रहातून राज्यातील पक्ष्यांचे वितरण, विपुलता अशी पक्षीशास्त्रीय दृष्ट्या माहिती मिळणार आहे. (Birds Map Collection)

प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ आणि डॉ. सलीम अली यांचे विद्यार्थी डॉ. एस. सुब्रमण्य, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे माजी संचालक डॉ. असद रहमानी आणि प्रवीण जे यांनी ही घोषणा केली. ही प्रक्रिया वैज्ञानिक स्वरूपाची आहे. असे असले तरी या प्रक्रियेमध्ये ज्यांना राज्यातील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हातभार लावायचा आहे असे सर्व लोक सहभागी होऊ शकतात. यामध्ये सामान्य नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, पक्षी निरीक्षक, पक्षी शास्त्रज्ञ भाग घेऊ शकतात. नकाशा संग्रहाचा उद्देश 2023-24 या वर्षात राज्यातील अंदाजे 370 चौ. कि.मी. क्षेत्राचे सर्वेक्षण करणे हा आहे. (Birds Map Collection)

प्रत्यक्ष सर्वेक्षण 15 ऑगस्टपासून

सर्वेक्षण डिसेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आणि ऑगस्टचा मध्य ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत असे प्रत्येक हंगामात 60 दिवसांसाठी केले जाणार आहे. यामुळे राज्यातील पक्ष्यांमधील दीर्घकालीन बदल, त्यांच्या प्रजननाच्या स्थितीचे मानक मूल्यांकन तसेच हंगामी नमुन्यांविषयी माहिती मिळणार आहे.

या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. प्रणॉय बैद्य, जलमेश कारापूरकर आणि सुजीतकुमार डोंगरे करत आहेत. प्रकल्पाला राज्य वन खाते, गोवा विद्यापीठ, राज्य जैवविविधता मंडळ, राज्य पाणथळ प्राधिकरण आणि बर्ड काउंट इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT