मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा जिल्हा जल व स्वच्छता अभियान (डीडब्ल्यूएसएम) ची चौथी मासिक बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा कुशावती जिल्ह्याचे प्रभारी रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जिल्हा जल व स्वच्छता अभियानाचे सदस्य सचिव नारायण एस. तिरवेकर यांच्यासह आरोग्य विभाग, वन विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, पंचायत संचालनालय, गटविकास कार्यालये, जलसंपदा विभाग, कृषी विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) २.० आणि जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रलंबित कामांची स्थिती पंचायत संचालनालयाने बैठकीसमोर मांडली. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत प्रत्येक गावात स्थापन करण्यात येणाऱ्या ग्राम, जल व स्वच्छता समित्यांच्या स्थापनेबाबतही चर्चा करण्यात आली. या समित्यांमध्ये दोन महिला सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिला सदस्यांमार्फत गावांतील पाणीपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. पंचायत संचालनालयाने समित्यांच्या सदस्यांची अंतिम यादी तयार करून पुढील बैठकीपूर्वी संबंधित विभागांकडे सादर करावी, असे निर्देश देण्यात आले.
पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी प्रशिक्षण
ग्राम जल व स्वच्छता समित्यांची स्थापना झाल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या महिला सदस्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रशिक्षणाद्वारे गावपातळीवरच पाण्याची गुणवत्ता तपासण्याची क्षमता विकसित होऊन सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
सचिवांना माहिती अपलोड करण्याचे निर्देश
जल सेवा आकलन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सचिवांना ग्रामसभा बोलावून आवश्यक माहिती निश्चित मुदतीत केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रक्रियेमुळे गावांमधील पाणीपुरवठा व्यवस्थेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून भविष्यातील नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
बैठकीच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावंकर यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून शासनाच्या जल व स्वच्छतेशी संबंधित योजना प्रभावीपणे राबवाव्यात, प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत आणि बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिले.