गोवा

गोव्यातील आगळीवेगळी भजन स्पर्धा; १६०० कलाकारांचा सहभाग

मोहन कारंडे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा कला अकादमीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी 'भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर भजन स्पर्धा' ही आशिया खंडातील आगळीवेगळी स्पर्धा आहे. पंधरा वर्षाखालील मुलांचा गट, महिला गट आणि पुरुष गट अशा तीन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये सुमारे १६०० भजन कलाकार सहभागी होतात. त्यामुळे श्रावणात महिनाभर भजन तयारीत रमलेल्या या कलाकारांची कला फुलत जाते. गोवाभर विठुनामाचा गजर ऐकू येतो. परिसर पांडुरंग हरी नामघोषात दुमदुमला जातो. विविध सभागृहे, मंदिरे यामध्ये भजन पथके सराव करत असल्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण तयार होते. जणू पंढरीच गोव्यामध्ये अवतरल्याचा भास होत असल्याने गोव्याच्या भजन परंपरेला उज्ज्वल भवितव्य असल्याची जाणीव होते.

कला अकादमीचे नुतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे यंदा साखळी येथील रवींद्र भवन येथे बाल भजन स्पर्धा आणि महिला भजन स्पर्धेची अंतिम फेरी रविवार (दि. १३) पार पडली. उद्या दिनांक १५ रोजी पुरुष गटाची अंतिम फेरी साखळी येथेच होणार आहे. त्यानंतर विभागीय स्पर्धाचे व तिनही गटातील अंतिम फेरीचे बक्षीस वितरण होणार आहे.

बाल भजन स्पर्धेमध्ये किमान २५ पथके सहभागी होतात तर महिला आणि पुरुष भजन स्पर्धेमध्ये प्रत्येकी ८० ते ९० पथके सहभागी होतात. प्रत्येक पथकामध्ये १० ते १२ भजनी कलाकारांचा सहभाग असल्यामुळे सहभागी भजनी कलाकारांची संख्या १६०० च्या वर होते. विभागीय पातळीवरील स्पर्धेत पहिले व दुसरे बक्षीस मिळवणारी प्रत्येक केंद्रातील दोन पथके अंतिम फेरीसाठी पात्र होतात.

गोव्यातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात या भजन स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्यामुळे तरुणाईमध्ये भजन संस्कार वाढत आहेत. गोव्याला कलाकारांची खाण म्हटले जाते. त्याचे कारण अशाच स्पर्धेतून कलाकार तयार होतात. गोव्यात संगीत महाविद्यालय आहे. त्याचबरोबर कला अकादमीचे वेगळे संगीत वर्ग घेतले जातात. संगीत तज्ञांकडून खाजगी वर्गही घेतले जातात. या सर्वातून मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी भजन क्षेत्रांमध्ये येतात.

पुरुष गटाची स्पर्धा ही बरीच अटीतटीची होत असते दरवर्षी किमान बारा पथके पुरुष गटासाठी अंतिम फेरीसाठी पोहोचत होती, मात्र ८ पथके अंतिम फेरीसाठी पात्र झालेली आहेत. यापूर्वी कला अकादमीचे भव्य सभागृह भरत असल्याने बाहेर स्क्रीन लावून रसिकांसाठी भजन स्पर्धा ऐकण्याची आणि पाहण्याची सोय करावी लागत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो भजन प्रेमी व कलाकार दरवर्षी उपस्थित राहून या भजन स्पर्धेचा आनंद घेत असतात.

किमान ३५ ते ४० मिनिटांचा वेळ या पथकांना दिला जातो. या वेळेमध्ये ही पथके आपली कला कौशल्य सादर करताना दिसतात. अनेक तरुण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करताना पाहणे आनंददायी ठरते. हार्मोनियम व पखवाजवर तरुणांची फिरणारे बोटे पाहिल्यानंतर गोव्याच्या भजन परंपरेला उज्ज्वल भवितव्य असल्याची जाणीव सर्वांनाच होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT