सासष्टी : विठू सुकडकर
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत बाणावली मतदारसंघात काँग्रेस पक्ष व आम आदमी पक्ष यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस हे प्रचारात सक्रिय झाले असल्याने त्याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो. असे असले तरी माजीमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या भूमिकेवर अपक्ष उमेदवार मारिया रिवेलो यांचे भवितव्य अवलंबून आहे.
बाणावली मतदारसंघात आपचे उमेदवार जोझेफ जिजस गेब्रिएल आंतोनियो पीमेंता यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवार लुईझा आंतोनियो परेरा, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रफन्स फिलिप फर्नाडिस व अपक्ष दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा मारिया रिबेलो निवडणूक लढवित आहेत. या चारही उमेदवारांपैकी आपच्या बरोबरीने काँग्रेसच्या उमेदवारही प्रचारात आघाडीवर आहेत.
त्यानंतर अपक्ष उमेदवार मारिया रिबोलो या प्रचारात तिसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ग्राफांस फिलिप फर्नांडिस हे चौथ्या स्थानावर आहे. बाणावली हा एकेकाळीचा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाकडे मतदारही आहेत. परंतु काँग्रेस पक्षांमधील नेत्यांचे अंतर्गत मतभेद, अस्थिर नेतृत्व आणि सध्या बाणावली मतदारसंघ आपकडे असल्याने आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखाली आप ही निवडणूक लढवित आहे. वाणावलीसह करमणे, केळशी, मोबोर याभागातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सध्या आप करताना दिसत आहे.
काँग्रेसच्या उमेदवार लुईझा आंतोनियो परेरा या वार्का पंचायतीच्या माजी सरपंच असल्याने त्या भागातील मतदार कॉंग्रेस पक्षाकडे आहेत. त्याच्या सोबतीला अन्य मतदारांची मते मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा मारिया लूज रिबेलो या बाणावलीच्या स्थानिक असल्याने त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री चर्चिल आलेमाव व त्यांचा पुतण्या वॉरन आलेमाव यांचा त्यांना अंतर्गत पाठिंबा असल्याची चर्चाही सुरू आहे.
मात्र, यातील खरे चित्र निकाला दिवशीच स्पष्ट होईल. मात्र, वार्का, करमणे, केळशी, मोबर भागात त्यांचा फारसा संपर्क नसल्याने त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसच्या उमेदवार लुईझा आंतोनियो परेरा या वार्का भागात एकदम स्ट्राँग आहेत. काँग्रेसची पारंपरिक मते मिळणार असली तरी त्यांच्याकडे केळशी, मोबोर, कारमणाने व बाणावलीतील मते मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ग्रफान्स फिलिप फर्नांडिस यांचा प्रचार इतरांच्या तुलनेत मंद गतीने सुरू आहे.
चौरंगी होणार लढत...
या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष वेधले असता आप, काँग्रेस व अपक्ष उमेदवार मारिया यांच्यात अटीतटीची लढत होणार हे निश्चित आहे. माजीमंत्री चर्चिल आलेमाव व त्यांचा पुतण्या वॉरन आलेमाव यांनी खुलेआम अपक्ष उमेदवार मारिया यांना पाठिंबा दिल्यास आपची मते कमी होऊन काँग्रेसच्या उमेदवार लुईझा अंतोनियो परेरा यांना विजयाची संधी चालून येण्याची शक्यता आहे. तसेच अपक्ष उमेदवार मारिया यांना जेवढी कमी मते मिळतील, त्यावर आपच्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.