पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या ज्येष्ठ क्रिकेटपटू बसप्पा मदार यांची पहिल्यांदाच होणाऱ्या आशियाई लेजेंड्स कप २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान चियांग माई (थायलंड) येथे होणार आहे. त्यांच्या सोबत पश्चिम विभागातून सांगलीचे अभिजीत कदम यांचीही निवड झाली.
हा पश्चिम विभागासह गोव्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. बोर्ड फॉर व्हेटरन क्रिकेट इन इंडिया (बीव्हीसीआय) यांनी ४० वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी आयोजित होणाऱ्या आशिया पातळीवरील पहिल्याच खंडीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. व्या ऐतिहासिक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि हाँगकाँग हे सहा देश सहभागी होणार आहेत.
भारतातील ज्येष्ठ क्रिकेटसाठी हा टप्पा मैलाचा दगड मानला जात आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी यांच्याकडे देण्यात आली असून, जतिन सक्सेना यांची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंतर-प्रादेशिक ज्येष्ठ क्रिकेट स्पर्धांतील कामगिरीच्या आधारे संघाची निवड करण्यात आली असून, देशभरातील अनुभवी खेळाडूंचा समतोल संगम या संघात पाहायला मिळतो.
गोवा व्हेटरन क्रिकेट असोसिएशनचे (जीव्हीसीए) अध्यक्ष तसेच बीव्हीसीआयचे सचिव विनोद फडके म्हणाले, आशियाई लेजेंड्स कप ही भारतातील ज्येष्ठ क्रिकेटसाठी ऐतिहासिक स्पर्धा आहे. बसप्पा मदार आणि अभिजीत कदम यांची निवड ही विविध विभागांतील प्रतिभेची साक्ष असून गोवा आणि पश्चिम विभागासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
जीव्हीसीएचे सचिव सुदेश प्रभुदेसाई यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले, आशियाई लेजेंड्स कपसाठी गोव्याचा खेळाडू निवडला जाणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अभिजीत कदम म्हणाले, वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे.
आशियाई लेजेंड्स कपमध्ये भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान असून, त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. आशियाई लेजेंड्स कप २०२६ मुळे व्हेटरन्स क्रिकेटला नवी दिशा मिळणार असून, अनुभवी खेळाडूंना खंडीय पातळीवर स्पर्धा करण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.
वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे फळ
आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना बसप्पा मदार म्हणाले, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. गोव्याचे नाव आशियाई व्यासपीठावर नेण्याचा मला अभिमान असून, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.