पणजी : बायणातील दरोडा प्रकरणी गोवा पोलिसांनी अखेर तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दरोड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून उर्वरित दरोडेखोरांनाही लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील सागर नायक यांच्या फ्लॅटवर सहा ते सात जणांच्या टोळीने मंगळवारी (दि.18) मध्यरात्री अडीचच्या दरम्यान दरोडा घालून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दरोडेखोरांनी सागर नायक यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा व मुलगी नक्षत्रा यांनाही मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या सागर नायक यांच्यासह हर्षा व नक्षत्रा यांनाही उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले होते. उपचारानंतर तिघांना घरी पाठविण्यात आले होते. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी वास्को, मुरगाव, वेर्णा, मडगाव येथील पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. हे दरोडेखोर वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील असून दरोडा अतिशय नियोजनबध्द रित्या घालण्यात आल्याने त्या दरोडेखोरांनी या इमारतीची व सागर नायक यांच्या फ्लॅटची नीट रेकी केली असावी, असे सांगण्यात येत होते. तसेच या दरोडेखोरांमध्ये स्थानिकाचा समावेश असावा असा कयास व्यक्त करण्यात येत होता. अखेर त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना चौकशीसाठी आणले जात आहे.